माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

बुधवार, २९ जुलै, २०२०

जुलै २९, २०२०

Quick Heal -दहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली*

readfist.blogspot. com


 Quick Heal 

ओळख 


     नाव कैलास काटकर. गाव मूळच सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. नटावाडीतील एका छोट्या खोलीत  हे पाच जणांचे कुटुंब राहत होते.

        कैलाश सगळ्यात थोरला. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच. घरी काहीही परिस्थिती असली तरी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवण्यात आले. पुस्तके खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, फी भरण्यासाठी पैसे नाहीत. कसबसा रडत दहावीत पोहोचला. पण दहावीनंतर त्यांनी पुस्तकी शिक्षण सोडून खरे शिक्षण सुरू केले. व्यावहारिक शिक्षण जे जीवन शिकवते.
   

कैलासचा स्वभाव 

      कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती. वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती. त्याबद्दलचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता.काही तरी करू असा आत्मविश्वास होता. दहावीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरवात केली.

      एक दिवस त्याला पेपर मध्ये एक जाहिरात दिसली, एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याची आवश्यकता होती. कैलासने आयुष्यात कधी  कॅलक्युलेटर बघितलासुद्धा नव्हता. त्याने तरी अप्लाय केले. नशिबाने मुलाखतीसाठी आलेल्या पंचवीस जणांमधून त्याची निवड झाली. अंगभूत खटपटेपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, फसेट मशिन अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या.

किती जरी झालं तर खटपट्या माणूस नोकरीत किती दिवस शांत बसेल?

 महत्वाचा निर्णय 


नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत स्वतःचा दुरूस्तीच दुकानं सुरु केलं.  सोबत एक हरकाम्या मुलगा सुद्धा ठेवला. त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटापट चालायची. पैसे बऱ्यापैकी मिळू लागले. एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसलं. त्याने चौकशी केली, कोणी तरी सांगितलं,

” याला कॉम्प्युटर म्हणतात. आता येणार युग कॉम्प्यूटरचं असणार आहे.”

कैलाश विचारात पडला. येणार युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता.

प्रथम संधी 


नव्वदच्या दशकातला तो काळ. कॉम्प्यूटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता. त्याच्या येण्यान आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या-उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या. कॉम्प्यूटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येचं दिसायचे. कैलाशला कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हत.

     एकदा चान्स मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाईम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे तीन प्रिंटर बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं  ते फेकुनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती. पण योगायोगाने कैलाश तिथे आले होते. त्यांनी पैजेवर ते मशीन दीड तासात दुरुस्त करून दाखवले. 

टाईम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरचं नाही तर  कैलाशच्या हातात आपले कॉम्प्यूटरसुद्धा देऊन टाकले. दोन वर्षाचा दुरुस्तीचा करार केला. कैलाशच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. टाईम्स ऑफ इंडियाच बघून बाकीच्या कंपन्या, बँकादेखील त्यांना काम देऊ लागल्या. पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलाश काटकर हे नाव प्रसिद्ध झालं.

कौटुंबिक जबाबदाऱ्या 

स्वतःच शिक्षण अर्धवट सुटल पण कैलाश यांनी आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही. धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेजकरून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.

त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेचं उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात. मग ते आजारी पडू नयेत यासाठी असत रोगप्रतिबंधकारक औषध यालाच म्हणतात अँटी व्हायरस.

या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला कैलाश यांच्याच दुकानांत यायचे. लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात करणार. काहीतरी करून कैलाश ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचे.त्यांच्या धाकट्या भावाने संजयने सारख्या सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते. जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडले.

त्याच वेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार. त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय काटकर अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला. दीड वर्षे लागली पण मराठी माणसाच स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. त्याला नाव देण्यात आलं

क्विक हील ची सुरवात 


*साल होत १९९५.*

     संजयनी स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला,पकेजिंग तयार केलं. कैलास काटकर कंपन्याच्या दारोदारी फिरून आपल प्रोडक्ट खपवू लागले. कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटी व्हायरस असण किती गरजेचे आहे हे पटवून संगे पर्यंत त्यांना नाकीनऊ यायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटीपार्क उभं राहत होत. अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटी व्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं. क्विक हिल अँटी व्हायरस बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.

अजून मोबाईल फोन देखिल आले नव्हते अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होतं. कैलाश काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले. पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्याकाळातही क्विकहिल मोठी झाली. *मंगळवार पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुट च्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले कळले देखील नाही.*

*आज क्विकहिल हे भारतीय आहे, पुण्यात तयार झालंय यावर कोण विश्वास ठेवणार नाही.*

तिथ तेराशेच्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे ऑफिसेस उघडलेले आहेत. आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटी व्हायरस बसवेल दिसेल. *आणि हे सगळ साम्राज्य उभ केलंय एका दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलान.*

*👉विशेष माहिती :* हा उद्योजक मराठी माध्यमातून शिकला होता. हे आजकालच्या पालकांनी लक्षात घ्यावे.




🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सोमवार, २७ जुलै, २०२०

जुलै २७, २०२०

वाचनीय लेख - बदाम- bada

readfist.blogspot. com

        नुकतीच सावळे सरांची नव्या शाळेवर बदली झाली. ते गावं, ती शाळा कधीच पाहीलेली नसल्याने आता त्या गावात जाऊन शाळा शोधावी लागेल म्हणून साबळे सर जरा लवकरच घरातून बाहेर पडले. 

मुख्य रस्ता सोडुन चार किमी आत नागमोडी वळण घेत घेत गाव होतं. जराश्या दुरूनच, गावातल्या मंदिराचा कळस दिसला. तस सरांच्या जीवाला बरं वाटल. 'मोकळं'  होण्यासाठी सरांनी  झाडी पाहुन गाडी थांबवली. व मोकळे व्हायला आडोश्याला गेले..

झुडपाच्या मागे,  एक छोटस तळं होत. त्या तळ्यावर तीन चार म्हशी पाणी पित होत्या. तर बाजूला सुमारे तेरा चौदा वर्षाचा एक मूलगा, हातात काठी घेऊन उभा होता. आज पहिलाच दिवस असल्याने शाळेत गेला नसेल असा सरांच्या मनात विचार आला. त्यालाच शाळा नेमकी कुठे आहे हे विचारावं म्हणून त्या पोराला सरांनी आवाज दिला.

'काय रे पोरा.. गावची शाळा कुठे आहे..?'

त्याने मंदिराच्या कळसाकडे बोट दाखविलं.

'अस तुम्ही गावातून सरळ गेलात कि मंदिर लागेल, मंदिराकडून डावीकडे वळलात कि लगेच तिथे समोरच शाळा दिसेल. तुम्ही कोण साहेब आहेत का..?

'नाही रेऽ मी ह्या गावातला नविन शिक्षक आहे. तू कोणत्या शाळेत आहे..?'

इतक्यावेळ त्याच्या चेहऱ्यावर असलेले निरागस भाव भितीमध्ये बदलले. तो, काहीच न बोलता पटकन त्याच्या म्हशीकडं पळून गेला. सरही जास्त लक्ष न देता गाडीवर गावाकडे निघून गेले.

    मंदिरापासून डावीकडे वळले तेच त्यांना समोर तारेच कुंपण व वर्गखोल्या दिसल्या. पटागंणात साधारण पुरूष उंचीचे चार लिंबाचे झाड दिसले. त्याच्या बाजूला एक पूर्ण वाळलेले पुरूषभर उंचीच 'बदाम'च्या झाडाचा सापळा दिसला. वाळलेल्या झाडाखाली पानांचा लवशेष सुद्धा नव्हता, ह्याअर्थी ते वाळून भरपूर दिवस झाले असतील असं त्यांना वाटल. 

तो दिवस जाँईन होण, साफसफाई व सरांना पहायला आलेल्या लोकांना बोलण्यातच गेला. लेकराची ओळख, नाव वगैरे विचारताच आलं नाही. 

जाताना सर परत त्या तलावाजवळ आले. ह्यावेळीही तो मुलगा तिथेच म्हशीला पाणी पाजत होता. एक म्हैस पाण्यात थांड मांडुन बसली होती. तर बाकीच्या तीन बाजूला चरत होत्या. सरांची व त्या पोराची जशी नजरानजर झाली तसा तो पोरगा उठला. व काही कळायच्या आतच, पाण्यात बसलेल्या म्हशीला मारायला लागला. त्याच्या दोनचार फटक्याचच ती म्हैस उठली तरी त्याच तिच्यावर सपासप मारणं चालूच होत. सरांनी जास्त लक्ष न देता गाडी पुढे नेली. सहज गाडीच्या काचात बघितलं, तर आता तो पोरगा शांतपणे सराच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात होता.

दुसऱ्या दिवशी सर सातवीचे वर्गशिक्षक झाल्याने वर्गात गेले.  गुडमाँर्निंग वगैरे झाल्यावर हजेरी काढली. लेकराच नाव घेतल कि 'येस सर' म्हणत हजेरी चालू होती. सर नाव घेऊन जो 'येस सर' म्हणेल त्याच्याकडुन त्याच्या कुटूंबाची माहीती गोळा करत होते.

'अविनाश दिपक पंडीत' अस दोनदा तीनदा नाव घेऊनही कोणीही येस म्हणल नाही. तेव्हा एका मुलाने 

'सर तो शाळेत येत नाही.' अस उत्तर दिलं.
'का रे..?'
'सर, तो खूप आगाऊ आहे म्हणून त्याच्या वडीलांनी त्याला म्हशीमागे लावलं.'

'अस का..? त्याच्या वडीलांना कोण बोलवून आणत रे..?'
कुणीच हात वरी केला नाही. उलट

'सर, त्याचे वडील त्याला बोलवायला गेलो कि आम्हालाच हुसकावून लावतात.'

सरांनी पुढच्या लेकराच नाव घेऊन त्याच्या कुटूबांची माहीती गोळा करायला सुरवात केली. सर्व वर्गाची माहीती  घेऊन एक छानशी गोष्ट सांगून पहिल्या दिवसाची सुरवात केली. 

त्या दिवशीही, साबळे सर त्या तळ्याजवळ आले तेव्हाही तो पोरगा तिथेच म्हशी घेऊन दिसला. काल सारखचं त्यान सरांची नजरानजर होताच म्हशीला प्रसाद द्यायला सुरवात केली.

अरे.. काल पाण्यातल्या म्हशीला मारलं. आज चरत असलेल्या म्हशीला मारलं..? सराच ह्या गोष्टीकडे लक्ष गेल. पण हा केवळ योगायोग असेल म्हणून दुर्लक्ष केलं. 

तिसऱ्या दिवशी परत जेव्हा 'अविनाश पंडीत' नाव आल त्यावेळी त्यांना सहजच तळ्याजवळील पोरगं लक्षात आलं. कदाचित तोच अविनाश असेल म्हणून त्यांनी विचारणा केली तर तोच 'अविनाश' होता हे पक्क झालं. आपल्या वर्गातील मुलगा वर्गात आला पाहीजे ह्याचा विचार त्याच्या मनात आला. आज जर तो तळ्याजवळ दिसला तर त्याला बोलायच अस त्यांनी ठरवलं.

त्यादिवशीही जाताना सर तळ्याजवळ आले. तेव्हा 'अविनाश' एका झाडाला काट्याच कुंपन करत पाठमोरा बसला होता. तो काम करत असताना एवढ्या तंद्रीत होता कि पाठीमागे आलेल्या साबळे सराचां, त्यांच्या गाडीच्या आवाजाकडे त्याचं लक्षही नव्हतं.

'अविनाशऽ' सरानी आवाज दिला.'

एका क्षणात त्याची तंद्री तुटली. तसं, त्याने मागे वळून पाहीलं. सरांना पाहताच तो धूम ठोकून पळून गेला.

सरांनी त्याला दोन चार आवाज दिले. 'थांब थांब' म्हणाले. पण त्यांच्या प्रत्येक हाकेवर तो दुर दुर जात होता.

सरांनी त्याचा पिच्छा सोडला. तो ज्या झाडाजवळ बसुन काम करत होता त्याच्यावर सरांची नजर गेली तर ते 'बदामाच रोपटं' होत. जंगलात बदामाच झाड कधीच पाहील नव्हतं. म्हणजे हे नक्किच आपोआप आलेल नाही हे सरांना लगेच लक्षात आलं. दुर जाऊन गाडीच्या काचामध्ये पाहील तर तो म्हशीला मारत होता.

तो दिवसही तसात गेला. अस जवळपास दहा बारा दिवस चालल होत.  सर जवळ जायचां, बोलायचां प्रयत्न करायचे तसा अविनाश पळून जायचा. रोपट्याला पालवी फुटली होती. आता तो पाठमोरा सापडला तर आवाज द्यायचाच नाही. पहिल्यांदा त्याला पकडायच व नंतरच बोलायच हे त्यांनी ठरवल. पण लगेच लक्षात आल कि त्या दिवसापासून तो तसा पाठमोरा सापडलाच नव्हता. तो ही हुशार झाला होता.

'काय कराव म्हणजे तो आपल्याला बोलेल..?'

सर त्या दिवशी शाळेत जातानाच तळ्याजवळ आले. सर  तळ्याच्या विरुद्ध दिशेला रस्त्याच्या ह्या बाजूला खाली उतरले. त्यांच्याजवळ 'बदामाचं रोपट' होत. ते त्यांनी ह्या बाजूला लावलं. आज सरांनी मुद्दामहुन अविनाशवर लक्षच दिल नाही. रोपटं लावून सर शाळेत निघून गेले. शाळा सुटल्यावर जाताना पाहिल तर त्या रोपट्याच्या बाजूला काट्याच छोटस कुंपन केलेल सरांना दिसल. अविनाशनेच केलं असणार. बाण बरोबर निशाण्यावर लागल्याच समाधान घेऊन, परत एकदा अविनाशकडे दुर्लक्ष करुन सर निघून गेले.

सर, रोज येता जाताना त्या ठिकाणी थांबायचे व त्यांनी लावलेल्या रोपट्याकडे पहायचे. कधी त्याच्या बाजूच गवतं उपटलेल, तर बाजूची जागा स्वच्छ केलेली दिसायची. रोज रोपट्याच आळ चिखलाने भरलेल दिसायच. ह्याचा अर्थ अविनाश नित्यनियमाने झाडाला पाणी टाकत होता.

एकदिवस, शाळेत जाताना रोजच्या जागेवर थांबले. तर अविनाश त्यांना दुरवरुन पाहताना दिसला. सर काही बोलत नाहीत, काही विचारत नाहीत म्हणून त्याची भिती कमी झाल्याने तो पळाला नाही. सर त्यांनी लावलेल्या रोपट्याजवळ गेले. व बाजूला खोदायला सुरवात केली. 

'काय करताय सर..?' पाठीमागून, बऱ्याच अंतरावरुन आवाज आला. तो पळुन जायला सोप्प पडेल अशा सुरक्षित ठिकाणी उभा होता. सरांनी त्याचा आवाज 'बरोबर' ओळखला. व तो स्वत:हुन बोलला ह्याचा त्यांना आनंद झाला. पण चेहऱ्यावर अजिबात न दाखवता ते म्हणाले

'हे झाड शाळेच्या पटांगणात लावणार आहे.'

'नका लावू. जगणार नाही.'

सर अवाक् झाले. 'का नाही जगणार..?'

'शाळेत, चार पाच फुटावरच खडक आहे. त्यामुळे पाणीच नाही मिळणार झाडाला..'

सराच्या नजरेसमोर पटांगणातल वाळलेल बदामच झाड आलं. 

ह्याच्यापेक्षा ते लिंबाच झाड लावा. त्याला पाणी कमी लागत. व एकदा टिकल कि ते लवकर मरत नाही.

सर एकदम आश्चर्यचकित झाले. वनस्पती व गावच्या भूगोलाचा चांगलाच अभ्यास असल्याच पाहुन ते आश्चर्यचकीत झाले. निसर्गाने किती शिकवील त्याला.. आपल्याला जी गोष्ट लक्षातच आली नाही ती त्याला किती लवकर समजली..

'अरे, पण आता माझी पंधरा दिवस ट्रेनिंग लागली. मी येणार नाही तेव्हा झाडाची काळजी कोण घेईल...?'

'मी घेईल..!'

'ठिक आहे. जर तू पंधरा दिवस ह्या झाडाची काळजी घेतली तर, मी तुला चित्रकलेची वही बक्षीस देईल.'

त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान आलं.

सर पंधरा दिवसाने आले तेव्हा त्याच्या रोपट्याने चांगलच अंग धरलेल दिसलं. सर खुश झाले. त्यांनी दुरवर उभ राहुन आपल्याला पाहणाऱ्या अविनाशकडे पाहील. तो काही जवळ येणार नाही म्हणून त्यांच्याजवळची 'चित्रकलेची वही' त्यांनी रोपट्याच्या बाजूला ठेऊन निघून गेले.

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना त्याच रोपट्याजवळ तीच वही होती. त्यांनी वही हातात घेऊन पहिल्या पानावर पाहील तर, त्याच्यावर एक चित्र होत. एक मुलगा काढला होता. त्याच्यावर ढगात (म्हणजेच स्वप्नात) झाडांनी नटलेली शाळा, लेकरं व एका पोराला मारताना मोठा माणूस काढला होता.

सरांनी त्याच्यावर 'गुड' लिहील. तसच हाताने 'सुंदर' म्हणून त्याला खुणावलं. त्याचा चेहऱ्यावर एक सुरेख हास्य दिसलं.

तो रोज एक चित्र काढायचा. सर पाहायचे. चित्र अजिबात चांगले नव्हते पण सर प्रत्येक वेळी गुड, छान लिहुन त्याला न चुकता सुंदर आहे अस खुणवायचे. 

आता अविनाशची हळुहळु भिती कमी होऊ लागली. सराच्या जवळ असताना तो अंतर ठेऊन म्हणा किंवा पळून जाण्याच्या तयारीत नसायचा. 

'तू शाळेत का येत नाहीस..?'

'वडील नको म्हणतात.'

'घरी कोण कोण असत..'

'दोन बहिणी, आई, वडील व मी..'

'अच्छा, तुला अभ्यास करायला आवडत का..?'

'हो!' अगदि हळू आवाजात. त्याचा जो झाडाबद्दल आत्मविश्वास होता त्याचा लवलेशही हे उत्तर देताना नव्हता.

'बरं, आता उद्या तुला मी वही पुस्तक देतो. आपण चित्रासारखचं करत जाऊ. मी येता जाता पाहील. चालेल..?'

चेहऱ्यावर एकदम स्मित करत तो 'हो' म्हणाला. ह्यामुळे वडीलांनाही काही अडचण होणार नव्हती. व शिकताही येणार होत ह्यामुळे तो अतिशय आनंदी दिसत होता.

सरांनी पुढे काही दिवस रोज पाढे लिही, शुद्धलेखन लिही, शब्द लिही असा अभ्यास देत गेले. सुरवातीला त्याचं खूपदा चूकलं. पण सरांनी कधीच त्याला रागावलं नाही कि चूकलयं ह्याची जाणीव होऊ दिली नाही. 'फक्त तु ह्यापेक्षा ह्या पद्धतीने करुन पहा,' चुकले किती ह्यापेक्षा बरोबर किती आले ह्याचा आकडा लिहुन, बरोबर आलेल्यांसाठी त्याची प्रशंसा करत राहीले.

हळुहळू दोघातल अंतर कमी होऊ लागलं. तो आता चांगलाच धीट झाला. सरही शाळा सुटल्यावर अर्धा एक तास मुद्दामहुन त्याला वेळ देऊ लागले. तोही सरांची आता आतुरतेने वाट पाहु लागला. 

बदामाचे दोन्ही रोपट्याच झाडात रुपांतर होऊ लागलं. झाड व अविनाश झपाट्याने वाढू लागले. मधळ्या काळात सरांची अजून दोन तीन गावात बदली होऊन सर निवृत्तही झाले.

एकदिवस सरांच्या घरी पोस्टमनने पार्सल आणून दिलं त्यात 

'सर, मी अविनाशऽ.. तुमच्या लक्षातही आहे कि नाही कोण जाणे..? पण मला तुम्ही लक्षात आहात. मी तूम्हाला विसरण शक्यच नाही. ढोरामागच्या पोराला, खोड्या करणाऱ्या म्हणून प्रसिद्ध पोराला तुम्ही माणसात आणलं. आज मी एसटीआयची परिक्षा पास झालो. आज माझे सत्कार वगैरे होत आहेत पण तुमच्या शिवाय सत्कार मला नकोच आहे. त्यामुळे मी सर्व सत्कार टाळत आहे. ह्या सत्कारापेक्षा तुमचे दोन शब्द माझ्यासाठी अमूल्य अाहेत. मला माहीत आहे कि तुम्ही नक्किच मला पत्र पाठवून माझी ईच्छा पूर्ण करणार.. एक सांगू.. आता जेव्हा मी त्या वह्या पाहतो त्यावरच तुम्ही तपासताना मुद्दाम चूकीच्या उत्तराकडे दुर्लक्ष केलेल कळतं. पण त्याचमुळे मला 'चूकीचं सोडुन द्यायच, चांगल ते घ्यायचं' हे कळाल. त्या जोरावरच मी आज ईथपर्यंत आलो. तुम्ही गेल्यावर मी ते दोन्ही बदामाचे झाड वाढविले. त्याच 'बदामाच्या सावलीत' मला परत एकदा तुमच्याकडुन 'सुंदर' म्हणवून घ्यायच आहे.. याल का..?

आणि हो.. तुम्हाला आठवत का कि म्हशीला मारायचो... ते मी तुम्हाला पाहुन त्यांना मारायचो. तुमच्या अगोदरच्या सरांनी कधीच मला समजून घेतल नाही. त्यांचा राग मी म्हशीवर काढायचो. 'शिक्षक' म्हणल कि मला त्यांचाच चेहरा समोर यायचा व म्हशीला 'शिक्षक' समजून बदडायचो..!  चूकल्यावर 'चूक' म्हणून जेव्हा ते मारायचे तेव्हा त्यांना वाटायच कि मी सुधारेल.. पण मी त्यांच्यापासून दूर जात होतो ते त्यांना कळालच नाही. पण तुम्हीच शिकवल ना चांगल ते घ्यायच.. तेव्हा त्या सराबद्दलही माझ्या मनात काहीही द्वेष नाही. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. नाही का..? 

सोबत, तुमच्या झाडाचे दोन बदाम पाठवत आहे.!! 

*बालक , पालक वं शिक्षक विचाराने एकत्र आल्यास चांगली पिढी तयार होते !*





🙏🌼🌞🌼🙏

शनिवार, २५ जुलै, २०२०

जुलै २५, २०२०

अत्तर

readfist.blogspot. com
#AD_कथा

'अत्तर'

     अमेय घरी आला. लॅपटाॅपची बॅग त्याने हाॅलमधील कॅबिनेटच्या ठरलेल्या खणात ठेवली. त्याच्या वरच्याच ड्राॅवरमध्ये त्याने कारची चावी, घराची चावी, वाॅलेट, रिस्टवाॅच आणि खिशाला अडकवलेलं पेन ठेवलं. फुल शर्टच्या बाह्यांची बटणं सोडत, कोपरापर्यंत बाह्या दुमडल्या आणि टायची नाॅट सैल करत तो, सोफ्यावर बसला आणि आवाज दिला ... "आभा... मी आलोय गं". आणि पुन्हा एकदा त्याच्या मनात आलं... "मॅनेजमेंटनीही काय अवाच्या सवा मोठा बंगलो देऊन ठेवलाय... रहाणारे आम्ही फक्त अडिच लोक त्यात". 

अमेयचा आवाज ऐकून त्याची बायको आभा... आणि त्या दोघांची १२ वर्षांची लेक आस्मा, आतून बाहेर आल्या. आस्मा जाऊन धप्पकरत बसली, तिच्या बाबाच्या शेजारी... आणि आभाने टेबलवर ठेवलेल्या जगमधील, पाणी आणलं एका काचेच्या ग्लासमधून अमेयसाठी. अमेयने घटघट पाणी प्यायलं... ग्लास लेकीकडे देत म्हणाला... "जा ठेऊन ये सिंकमध्ये... काम कर जरा... आळशी एक नंबर"... आणि खांद्यावर चापट मारली त्याने लेकीच्या. गाल फुगवत, नाक फ्रेंद्र करत आस्मा... ग्लास घेऊन उठली आणि बाबाच्या खिशातील मोबाईलवर डल्ला मारत, आत गेली पळतच. अमेयने जरासं हसत पाहिलं आभाकडे... आणि विचारलं तिला... "सो हाऊ वाॅज युवर डे बायको... आॅल सेटल्ड?". आभा बाजूला येऊन बसली अमेयच्या, नी म्हणाली... "चंडीगढ इज सो ब्युटिफूल अमेय... खूपच छान वाटतंय मला इथे आता. तुझी बदली झाल्यावर मला तर टेन्शनच आलेलं, की मुंबईत वाढलेलो आपण... कसं काय करायचं मॅनेज वेगळ्याच शहरात? बट धिस सीटी अॅक्सेप्टेड मी फुल्ली इन जस्ट थ्री मन्थ्स". अमेयने हसतच आभाचा हात धरला हातात, आणि विचारलं तिला... "तू जातेस ती NGO काय म्हणतेय?". आभाने तिच्या दुसर्‍या हाताने अमेयचा हात कव्हर केला, नी म्हणाली... "इट इज सो गुड अमेय. खूपच छान काम करतीये ही NGO. प्रचंड अॅक्टिव्ह आहेत हे लोक, बर्‍याचशा सामाजीक कार्यांमध्ये. मनापासून आनंद होतोय मला, फाॅर जाॅईनिंग देम अॅट राईट टाईम. रादर आजच आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो विझिटला. तिथे थांबलो... त्या सगळ्या आजी - आजोबांशी गप्पा मारल्या... उष्ण कपड्यांचं वाटप केलं... आणि त्यांचे खूप सारे आशिर्वाद घेऊन परतलो". अमेयने मान हलवून दाद दिली आभाला, आणि बोलला... "ग्रेट यार... किप युवरसेल्फ बिझी इन सच सोशल काॅजेस आभा. आणि जे मी तुला आॅलरेडी सांगितलय, ते लक्षात असूदे. डोन्ड सेल युवर टाईम अँड सर्व्हिसेस... डू इट आॅनररी. घरात एकजण रोज स्वतःला, थोडं थोडं विकतोय ते बास आहे". आभा "येस्स" म्हणत उठली जागेवरुन... आणि बोलली... "अमेय फ्रेश होऊन घे... स्वैपाक तयारच आहे. आस्माssss जेवायला चल". 

तेवढ्यात अमेयला काहीतरी जाणवलं त्याच्या आजुबाजूला... खूप परिचयाचं. पण त्याला नक्की कळेना, नेमकं काय ते. विचार करतच जागेवरुन उठला अमेय, नी फ्रेश व्हायला आत गेला. तेवढ्यात आलेली शिंक अडवायला, दोन्ही हात त्याने नाका - तोंडावर घेतले. शिंक तर बाहेर न येताच परतली, पण अमेय मात्र वास घेऊ लागला त्याच्या हातांचा - बोटांचा. "हा वास... कसलाय हा वास?... साॅलिडच ओळखीचा आहे... सेम... डिट्टो तोच वास... माझ्या लहानपणाशी कनेक्टेड काहीतरी आहे... पण नेमकं काय?". ह्या विचारातच अमेय हात - पाय - तोंड धुवून, नाईट ड्रेस घालायला गेला. कपडे बदलून झाल्यावर... रोजच्या सवयीनुसार अमेयने, देव्हार्‍यासमोर उभं रहात कुलदेवतेच्या फोटोला नमस्कार केला. बाहेर हाॅलमध्ये येत, आई - बाबांच्या फोटोंनाही नमस्कार केला त्याने... आणि सण्णकन लिंक लागली त्याची, त्या मघाच्या वासाशी. "आई... यस्स... आईच. खूप लहान असतांना... म्हणजे पाच - सहा वर्षांचा असल्यापासून, अगदी दहा - बारा वर्षांचा होईपर्यंत आपण आईबरोबर... प्रत्येक ठिकाणी हळदी - कुंकवाला जायचो. आईची शेपूट म्हणत असत आपल्याला सगळे. प्रधानबाईंकडे ही जायचो दरवर्षी. प्रधानबाई उपड्या हातावर एक अत्तर लावायच्या. मला ते उपडे हात एकमेकांमवर घासत... त्यांचा वास घेणं ईतकं आवडत असे की, मग मीच व्हाॅलिंटिअर व्हायचो येणार्‍या बायकांच्या उपड्या हातांना... अत्तरदाणीतील त्या कापसाच्या बोळ्याला काडी टेकवून, अत्तर लाऊन देण्यासाठी. हा तोच वास होता... अॅम डॅम शुअर. प्रधानबाई स्वतः ते अत्तर बनवत असत घरी, बरंच काय काय एकमेकांत मिसळून. पण असला पक्का ठरलेला होता फार्म्युला त्यांचा... की जरा कणानेही उन्निस - बीस होत नसे, त्या अत्तराच्या वासात. पण हा वास इतक्या वर्षांनी... म्हणजे आॅलमोस्ट तीस वर्षांनी, आपल्या बोटांना कसा काय आला?". 

अमेयचं विचारचक्र चालूच होतं की, त्याला आठवलं... त्याने आभाचा हात हातात घेतला होता ते. पानं वाढणार्‍या आभाजवळ तो घाईतच गेला... आणि तिचे दोन्ही हात हातात घेत, ते उपडे करुन नाकाजवळ नेत... अमेय वास घेऊ लागला. आणि पुन्हा एकदा भरला गेला उरात अमेयच्या, प्रधानबाईंच्या अत्तराचा तो चांगलाच परिचीत गंध. अमेयची ही कृती नक्की न कळल्याने, आभाने विचारलं त्याला काहीशा आश्चर्यानेच... "काय रे... काय झालं?". अमेयने आभाला विचारलं... "आभा... तुझ्या हातांना येणारा हा सुगंध... हा सुवास... हे काय लावलंयस तू हातांना तुझ्या?". आभानेही वास घेतला तिच्या हातांचा... आणि काहीतरी आठवून बोलली ती... "ओ येस्स... अरे मी तुला बोलले नाही का... की आज आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो. अरे तिथे एक आजी होत्या... साधारण ऐंशीच्या आसपास. त्यांच्याकडे एक अत्तरदाणी होती अरे... त्यातून आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याला, त्या अत्तर लावत होत्या. अँड यू नो व्हाॅट... त्या आजी चक्क मराठी होत्या अरे. अॅक्चुअली आय वाॅझ नाॅट एक्स्पेक्टींग एनी मराठी आजी हियर इन चंडीगढ'स ओल्ड एज होम. म्हणून मग मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला अरे.. बट आय केम टू नो दॅट, शी लाॅस्ट हर मेमरी लाँग बॅक". अमेयने घाईतच विचारलं आभाला... "आभा... त्या आजी दिसायला कशा होत्या? गोर्‍या, घार्‍या... कंबरेपर्यत येणारे दाट केस... आणि अतिशय प्रसन्न अशा?". आभा म्हणाली अब्सोल्युटली... एक्सेप्ट दॅट लाँग हेअर... बाॅबकट होता रे त्यांचा. पण का विचारतोयस?... व्हाॅट हॅपन्ड?". अमेय आता चांगलाच रेस्टलेस झाला होता. आभाकडे बघून बोलला तो... "आभा रात्रीचे साडेनऊ वाजलेत... पाऊण तासात आपण पोहोचू त्या वृद्धाश्रमात... लेट्स गो. आस्मालाही बरोबर घे. मी तुला गाडीत सगळं सांगतो... सो डोन्ट आस्क एनीथींग... जस्ट लिव्ह". आभाने मग एकही प्रश्न विचारला नव्हता. 
.
.
.
गाडी वृद्धाश्रमाच्या दाराशी पोहोचली, पस्तीस मिनिटांतच. गाडीतून बाहेर पडल्यावर आभाही आता, अमेय एवढीच उत्सुक होती... त्या आजींना भेटायला, अमेयकडून सगळं ऐकल्यावर. वृद्धाश्रमातील आॅथरीटींशी बोलून, अमेयने त्यांना सविस्तर सांगितलं सगळं. त्यांना मग लाॅबीमध्ये बसायला सांगून... आजींना बोलावण्यात आलं. त्या समोर येताच, अत्तराचा तोच सुवास दरवळला होता... अमेयच्या भोवताली. आजींचे डोळे बघूनच अमेयला खात्री पटली होती, ह्या प्रधानबाईच असल्याची. आठवी ते दहावी ज्यांच्याकडे... रसायन शास्त्र आणि बिजगणितच्या ट्युशन्सला, जात असे अमेय. त्यांच्याच बिल्डिंगमध्ये रहाणार्‍या, अमेयच्या आईची मैत्रीण असलेल्या, संकेत दादाची आई... म्हणजेच अमेयच्या प्रधानबाई. अमेयचे डोळे भरुन आले... आणि त्याने त्याची ओळख बाईंना देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण छे... पार शुष्क झाले होते, ते घारे डोळे आजच्या घडीला. अमेय प्रयत्न न सोडता, पुढे बोलू लागला... "बाई... प्लिज आठवायचा प्रयत्न करा. अहो आम्हा सगळ्यांना... अगदी तुमच्या घरच्यांनाही वाटतंय की, 'कैलाश मानस सरोवर यात्रेत' मालपा ला जे लँड स्लाईडींग झालं... त्यात तुम्ही गेलात. तुम्हाला खूप शोधलं हो संकेत दादाने... पण त्याला नाही मिळालात तुम्ही. प्रेतांचे नुसते खच पडलेले, असं म्हणाला संकेत दादा. खूपच रडला होता हो बाई तो... आम्हा सगळ्यांना हे सांगतांना. तुम्ही प्लिज काहितरी प्रयत्न करा आठवायचा. मी संकेत दादाला ताबडतोब फोन करतोय... त्याला इथे तातडीने बोलावून घेतोय. खूपच खुश होईल हो तो... जेव्हा कळेल त्याला की, त्याची आई जिवंत आहे". 

अमेयने भरुन आलेले डोळे पुसतच, मोबाईल लावायला घेतला संकेतला... आणि तेवढ्यात एक सुरकुतलेला, हिरव्या नसा दिसणारा, तलम गोरापान हात... पडला अमेयच्या हातावर. अमेयने वर बघितलं... आजींचे दोन्ही निळेशार डोहं, आता भरुन आले होते. अमेयकडे एकटक बघत आजी बोलल्या... "अठ्ठ्यांणवाच्या सप्टेंबरातच कळलं होतं संकेतला की, आपली आई जिवंत आहे. आला होता तो, त्या रेस्क्यू कँपात... जिथे त्या भूस्खलनातून वाचलेली लोकं ठेवलेली. मी ही होते त्यात... गंभिररीत्या जखमी... आणि धक्का बसून वाचा गेलेली. खूप वाईट परिस्थिती होती, आम्हा वाचलेल्या सर्वांचीच. तिथेच एके दिवशी हा माझा मुलगा संकेत आला... उभा राहिला येऊन माझ्यासमोर... दोन मिनिटं बघितलं माझ्याकडे... मला हात जोडले नी चक्क निघून गेला पुढे. वाचा गेलेली मी... ना आकांत करु शकले मग, ना धाय मोकलून रडू शकले. तब्बल सहा महिन्यांनी माझी वाचा परत आली... आणि मनसोक्त रडून घेतलं मी सर्वप्रथम. इथे - तिथे करत मग दोन वर्षांनी, मला एका भल्या गृहस्थाने इथल्या आश्रमात आणून सोडलं. गेले वीस वर्ष इथेच रहातीये मी. द्यायला पैसे नाहीत जवळ, त्यामुळे इकडची थोडी कामं करतेय. कोणीही माझ्या घरच्यांबद्दल विचारु नये म्हणून, स्मृतीभ्रंश झाल्याचं दाखवतेय. आणि तसं पाहिलं तर तेच खरंय नाही का? उरलाय कुठे मला काही भुतकाळ. पोटच्या पोरानेच पाटी पुसलीये माझी. जिवन बिमा पाॅलिसीचे पैसे... आणि पिटी केसमध्ये सरकारी नोकरी... खूप आहे हे नाही... एखाद्याला पराकोटीचं कृतघ्न व्हायला. तूला बघून मात्र आनंद झाला हो बाळा... माझं रक्त आणू नाही शकलं कोणाला माझ्यापाशी... पण माझं अत्तर मात्र घेऊन आलं हो तुला इथे. तेव्हा आता जमेल तसं येत जा मला भेटायला. डोळे हे कोणाची वाट बघण्यासाठीही असतात, हेच विसरलीये मी इतक्या वर्षांत". 

एवढं बोलून आजी जायला वळणार, तोच अमेय बोलला... "बाई... माझ्याबरोबर याल?... आमच्याकडे रहाल? मी माझ्या आई - बाबांना, केव्हाचाच गमावून बसलोय. चलाल आमच्याबरोबर आमची आई, नी आस्माची आजी बनून? मी जन्मात माझी बदली, मुंबईला करुन घेणार नाही. तुमची कस्टडी मिळवण्याबाबतचं इथलं सगळं पेपरवरर्क, मी करेन. सोबत कराल आम्हाला आमच्या... आय मीन आपल्या घरी?". प्रधानबाईंनी पदराचा बोळा करत, तोंडाला लावला... आणि हमसून हमसून रडू लागल्या त्या. अमेय, आभा, आस्मा... तिघेही पाया पडले त्यांच्या. अमेय जोडल्या हातांनीच बोलला... "मी लवकरच येतो तुम्हाला घेऊन जायला इथून... कायमचं". आजींच्या अत्तराइतकेच त्यांचे अश्रूही दर्वळत होते आता. पाठमोर्‍या चालत जाणार्‍या आजींकडे बघून... कधीतरी, कुठेतरी ऐकलेला शेर आठवला अमेयला... 

'इत्र से कपडोंको महेकाना
बडी बात नही
मजा तो तब है जब खुशबू
आपके किरदार से आए'

---------------------------------

रविवार, १९ जुलै, २०२०

जुलै १९, २०२०

भाऊबंदकी- जागे व्हा आता

readfist.blogspot.com

*👊🏻👊🏻भाऊबंदकी👊🏻👊🏻*


           दुपारचं जेवण करून मी बाहेर कट्ट्यावर पुस्तक वाचत बसलो झाडाखाली. लॉकडाऊनमुळे सगळे घरातच होते. मी थोडं आजूबाजूला पाहिलं. सर्व शांत होत. भर दुपार होती. चांगलच कडक ऊन होत. नाक्यावरून एक बाई डोक्यावर कापड घेऊन तोंडावर पदर ठेवून चालत येताना दिसली. कोण असेल म्हणून जरा जवळ आल्यावर बघितलं तर अंदाज आला माझी चुलती होती. मी बघून न बघितल्या सारखे केलं आणि पुस्तकात डोकं घातलं. चुलती माझ्यासमोरून हळू चालत गेली हे मला जाणवलं. पण मी काय लक्ष दिले नाही. गेले पंधराएक वर्षांपासून आमचं बोलणं नाही. चुलतीने बोलणं टाळलं होतं. आमच्या ह्या वडिलोपार्जित वाड्यावरून वाद होता चुलत्यात आणि वडीलात. वडील जाऊन पाच वर्षे झाली. घराच्या वाटणीत अर्धा वाडा त्यांना आणि अर्धा आम्हाला आला होता. आम्ही वरती बांधून प्रशस्त, व्यवस्थित केले होते. शेजारी चुलता आणि चुलती राहायची. दोन घराच्या मधोमध भिंत बांधली होती चुलत्यानं. नंतर वाटणीच खूळ चुलतीन काढलं होत. भावकीतून कळले होते की, आम्ही दोन्ही भाऊ कधी लक्ष देत नसत. आम्ही आणि आमचं घर एवढंच. कधी येणं जाणं नाही. बोलणं नाही. पण वडील जाताना एकच सांगून गेलते, माझ्या भावाला अंतर देऊ नका. तो चुकला पण माझा भाऊच आहे. हीच एक कुरकुर ते हृदयात घेऊन गेले.
        मग चुलती परत बाहेर आली आणि नाक्यावर गेली. मी पाहिलं गाडी काढली. मागे गेलो. पुढं चुलती वळणावर उभी होती. मी तिच्यापशी गेलो आणि विचारलं, "काय ग काकू, काय झालं?" चुलती थोडं घाबरल्या स्वरात म्हणाली, "अरं तुझ्या काकाच्या बीपी आणि शुगरच्या गोळ्या संपल्यात दोन दिवस झाले. लै त्रास होतंय त्यांना. गाडी मिळत नाही ना रिक्षा, सगळं बंद आहे. मी म्हटलं, "बघू गोळ्या पाकीटं". तिने जुने पाकीट दिले आणि दोनशे रुपयांची नोट आणि म्हणाली जर जमल्यास अर्धा किलो डाळ पण मिळाली तर घे." मी पिशवी आणि पैशे घेऊन गाडीवर निघालो. चुलतीला एकच मुलगा होता सुनील. आम्ही बंटी म्हणायचो. लहानपणी एकत्र खेळायचो आम्ही. एकत्र खात-पीत खेळायचो. तो मला दाद्या म्हणायचा. पुसटस् आठवते, पण नंतर येणच बंद केलतं त्यांनी. फार जीव होता माझ्या आईचा त्याच्यावर. आणि छोटी चिमू ती पण फार गोड होती. नंतर त्यांनी यायचे बंद केल्यापासून परत बोलणं नाही. चिमू परदेशी असते. पाच वर्षांपूर्वी आली होती आणि बंटी हा कलकत्यात असतो. लव्हमॅरेज करून तिकडेच सेटल झाला. तो पण चिमू आली तेव्हाचं  दिसला होता. परत काय आला नाही. चुलता भूसंपादन विभागातुन सेवानिवृत्त झाला होता. पेन्शनवर घर चालत असेल. आधे मधे चिमू आणि बंटी पैसे पाठवत असतील.. जर नसतील पाठवत तर कसं दिवस काढत असतील ह्या विचारांच्या घालमेलीत कधी मेडिकल दुकान आले कळालच नाही. उतरून गोळ्या घेतल्या. दोन महिन्यांच्या एकदाच घेतल्या परत त्रास नको म्हणून. बाजूला किराणा मालाचे दुकान चालू होते. तिथून डाळी, तांदूळ आणि इतर भाजी व टमाटे, बटाटा, कांदा असे वस्तू त्याच दुकानात भेटली. मग ते घेऊन निघालो. घरासमोर गाडी लावली. आई गेटसमोर आली होती. मी आईकडे बघत चुलत्याच्या घरात गेलो. चुलता खुर्चीवर बसला होता. त्यांनी माझ्याकडे बघितले. भिंतीवर वडिलांचा, चुलत्याचा फोटो लावला होता. कुंकू लावलेलं फोटोला बघून माझं मन भरून आलं. भावाचं प्रेम होतं शेवटी. चुलती आली. मी पिशवी तिच्याकडे दिली. चुलती भारावून आली होती. चुलता उठला. माझ्या डोक्यावर हात ठेवत डोळे पुसत आत गेला. चुलती स्वतःला सावरून, "एवढं सगळं आणलं.. घरात खरंच काय न्हवतं रे.. वरचे किती पैसे देऊ ?" मी दोनशेची नोट तिच्या हातात ठेवत, राहू दे म्हणालो. सगळं ह्या पैश्यापायी झालंय गं. चुलती न राहवता माझ्या गळ्यात पडून रडली. चुलता आतून गूळ शेंगा घेऊन आला. माझ्या खिशात टाकला. लहानपणी तो माझ्या खिशात असंच गपचिप टाकायचा हे आठवलं. मला चुलता विसरला न्हवता. मी सावरलो, चल येतो मी म्हणालो. काय लागलं सवरलं तर हाक मार म्हणून मी बाहेर आलो. आईने फाटक उघडलं. आत गेलो. आईचे डोळे पाणावले होते. तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि वडिलांच्या फोटोला दिवा लावला.
               मग मी कधी काय आणायला जातो तेव्हा चुलती बाहेर येते. किश्यात पैसे ठेवते आणि पिशवी देऊन काय पाहिजे ते सांगते. आज महिना होत आला लॉकडाउनला. दिवस चालले आहेत पण आज सकाळपासून पलीकडील भिंतीचा आवाज येत होता जोरात. जसे भीतीवर मारल्या सारखे. आम्ही उठून बाहेर गेलो. बघतो तर चुलती घरा बाहेर रडत उभारली होती. मी विचारायच्या आधी ती मला रडून सांगू लागली, "बघ रे पिंट्या, काका कसं करायला ?" मी, आई आणि लहान भाऊ पटकन आत गेलो. चुलता पार घेऊन भिंतीवर मारत होता. आम्हाला बघितल्यावर पार बाजूला टाकली. आईकडे बघत पुढं आला. आईच्या समोर येऊन हात जोडत माफ कर मला वैने म्हणत खाली बसला. आणि ओकसाभोक्षी रडू लागला. आईच्या डोळ्यात पाणी वाहू लागलं. चुलती तिथंच होती. ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. मी, माझा भाऊ, आमच्या बायका हे सर्व बघत उभे होतो. आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. चुलत्याला उठवून खुर्चीवर बसवले. तो थोडा शांत झाला. आईच्या डोळ्यातले पाणी बघून, त्याला कळले की आईने त्याला कधीच माफ केलंत. शेवटी ऋणानुबंधाची नाती तुटत नसतात. अखेर घर एकत्र आल होतं. आम्ही दोन्ही भावानी आणि आमच्या बायकांनी काय बोध घ्यायचा तो घेतला आणि ते कायम मनाशी बांधून ठेवला. 

*जगाचे लॉकडाउन कधी संपेल माहीत नाही. पण आमच्या दोन घराच्या मधला लॉकडाउन संपला होता.* 

*आपलाच..... अनाहूत लेखक.....* 
 
*ह्या लिखाणामुळे कदाचित काही भावंडं एकत्र येतील.ह्याच भावनेतून ही पोस्ट करावयाचे,धारीष्ट्य केले आहे...तसे झाले तर मी घेतलेले परीश्रमाचे सार्थक झाले,असे मी म्हणेन....... ..    :-  ....*






गुरुवार, १६ जुलै, २०२०

जुलै १६, २०२०

डॉक्टरनीच भूल उतरवणारा लेख लिहिला

डॉक्टरनीच भूल उतरवणारा  लेख लिहिला

वैद्यकीय व्यवसायाचा कॉर्पोरेट धंदा..
 
डॉ सचिन लांडगे. भुलतज्ञ, अहमदनगर.

हॉटेल टाकण्यासाठी तुम्ही आचारी असण्याची गरज नाही, तसंच हॉस्पिटल टाकण्यासाठी पण तुम्ही डॉक्टर असण्याची गरज नसते..

ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते.. पण मोठया मोठया उद्योगपतींना हे चांगलंच माहिती होतं.. मग त्यांनी टोलेजंग कॉर्पोरेट हॉस्पिटल्स टाकली आणि त्याचा "मनी मेकिंग बिझनेस" बनवायला सुरुवात केली.. तिकडे जाणारा आधीचा श्रीमंत क्लास तर होताच, पण त्यात नुकताच उदयास आलेला नवमध्यमवर्ग जास्त कॅच केला गेला.. जागतिकीकरणा मुळे सुबत्ता येत होती त्याचा फायदा उचलला.. सोबत कॅशलेस मेडिक्लेम कंपन्यांचं जाळं वाढवायला पद्धतशीर सुरुवात केली गेली.. आजारांच्या आणि मरणाच्या भीतीचं मार्केटिंग केलं जाऊ लागलं.. आपल्याला लक्षात येत असेलच की 1992 पासून खूप गोष्टी कमालीच्या बदलत गेल्यात..

मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलचा डोलारा सांभाळायचा तर मग मेंटेनन्स पण झेपला पाहिजे, त्यासाठी पेशन्ट इनपुट जास्त पाहिजे.. मग त्यासाठी सगळे मार्केटिंग स्किल्स वापरले गेले.. कॉर्पोरेट् हॉस्पिटलचे पॅम्प्लेट्स गावोगावी वाटले जाऊ लागले.. पेशन्ट कॅचमेण्टसाठी फ्री कॅम्प ठेवले जाऊ लागले, गरज नसताना (प्रिकॉशन म्हणून) तपासण्या सजेस्ट केल्या जाऊ लागल्या.. लोकंही "जरा सगळ्या बॉडीचं चेकप करा बरं" म्हणून भुलू लागले.. PRO गावंशहरातल्या डॉक्टर्सचे उंबरे झिजवू लागले.. कमिशनचं आमिष देऊ लागले.. 
आता वाडीवस्तीवरचा पेशन्ट पण डायरेक्ट पुण्यामुंबईला जाऊ लागला आणि "म्हातारीच्या इलाजासाठी वावर इकलं, पण नीटच करून आणली" हे अभिमानाने सांगू लागला..

जेवढा तुमच्याकडं पैसा जास्ती, तेवढं मोठं हॉस्पिटल निवडलं जाऊ लागलं.. आणि जेवढं मोठं हॉस्पिटल तेवढा अभिमान जास्ती वाटू लागला.. काहींना तर छोट्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची लाज वाटू लागली.. त्यात इन्शुरन्स असेल तर बोलायलाच नको.. 

कमी पैशात सर्व उपचार हवेत तर ऍडजस्ट केलं पाहिजे, हे विसरून, "तुमच्याकडे ऍडमिट होतोय तर उपकार करतोय", ही भावना वाढीस लागली.. त्यातूनच पेशंटचं काही बरंवाईट झालं तर मारणं धमकावणं नित्याचं झालं..
असो..

मग कॉर्पोरेट लॉबीनं फार्मा कंपन्यांना आणि सरकारला हाताशी धरलं.. सरकारातून आपल्या पथ्यावरचे कायदे आणि नियम करून घ्यायला सुरुवात केली..

Consumer Protection Act नं तर खूप परिस्थिती चिघळवली.. डॉक्टरांनी क्लीनिकल जजमेंटची साथ सोडली, आणि सगळं इन्व्हेस्टिगेशन बेस्ड होऊ लागलं.. तपासण्यांना महत्व आलं..  मग उपचाराचा खर्च वाढला.. त्याचा परिणाम म्हणून, समाजाचा डॉक्टरांवर संशय वाढला आणि डॉक्टरांचा समाजावरचा विश्वास कमी झाला..

पण अजूनही छोट्या आणि मध्यम आकाराच्या हॉस्पिटल्स मधून खात्रीशीर आणि रास्त भावात सेवा मिळतच् होती.. मग आला CEA.. Clinical Establishments Act.. त्यानं तर मध्यम आणि छोट्या हॉस्पिटल्सचं कंबरडंच मोडलं.. हॉस्पिटल कसं असावं याचे युरोपातल्या धर्तीवर बनविलेले नियम लागू केले गेले.. तिथले 'स्टँर्डडस' जसेच्या तसे लागू केले गेले.. तिथली ट्रीटमेंट कॉस्टिंग आणि इथली परिस्थिती याचा विचारच केला गेला नाही..  
कायद्याप्रमाणे सगळे नॉर्मस् पाळायचे म्हणलं तर छोट्या हॉस्पिटलना अजिबात शक्य नाही, किंवा मग उपचाराचा खर्च तरी अव्वाच्यासव्वा वाढतो.. मग समाजासाठी पुन्हा डॉक्टरच रडारवर.. 

अलीकडे छोट्या आणि मध्यम हॉस्पिटल्ससाठी प्रॅक्टिस करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.. स्वतःचं हॉस्पिटल टाकायची हिम्मतच बहुतांश जण करत नाहीत.. मग काय, व्हा कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन.. आणि डावही तोच आहे..

कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स हे फक्त प्यादे म्हणून वापरले जातात , तिथे कन्सल्टंट म्हणून राहायचे असेल तर मंथली टार्गेट कंप्लिट करावे लागते.. हॉस्पिटलला किती बिझनेस करून दिला, यावर त्या डॉक्टरचे तिथले भवितव्य अवलंबून राहते.. बिलिंग डॉक्टरांच्या हातात नसतंच.. लोकांना वाटतं तिथं डॉक्टरच लुटतात, पण ते मॅनेजमेंट कडून लुटले जात असतात.. 

पण तरीही तिथे जॉईन राहण्याशिवाय कित्येक स्पेशालिस्ट आणि सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांकडे पर्यायच् नसतो.. कारण स्वतःचं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल काढणं हे बहुतांश डॉक्टरांना परवडणारं नसतं..

ही सगळी सिस्टिम खरंतर आपणच जन्माला घातली आहे.. छोटे दवाखाने, छोटे नर्सिंग होम, फॅमिली डॉक्टर या सगळ्या संकल्पनांचा बळी देऊन..!

त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला - सरकार नवनवीन कायदे आणतंय की ज्याची पूर्तता करणे वैयक्तिकरित्या डॉक्टरला बहुतेक वेळा शक्यच् होत नाही.. त्यामुळे छोटी हॉस्पिटल्स बंद पडत चालली आहेत.. त्यात डॉक्टरांवर होणारे हल्ले - त्यामुळे वैयक्तिक हॉस्पिटल्स काढण्यापासून डॉक्टर्स पळ काढायला लागले आहेत..

Mediclaim वाले तर छोट्या हॉस्पिटलवाल्यांना कॅशलेससाठी दारात पण उभे राहू देत नाहीत, कॅशलेससाठी आता NABH accredition कंपल्सरी होत चाललंय.. की जे छोट्या हॉस्पिटल्सना शक्य होणार नाही.. त्यामुळे छोटे हॉस्पिटल्स अजूनच् खचत जाणार आहेत.. 

मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरही भरपूर प्रमाणात आणि कमी पगारात उपलब्ध व्हायला हवेतच.. यासाठी सरकारचं खाजगी वैद्यकीय शिक्षणाबद्दलचं धोरण त्यासाठी कॉर्पोरेट लॉबीच्या पथ्यावरच पडलं..  
समाजात डॉक्टर्सची संख्या कमी आहे म्हणून सरकारी कॉलेजेस वाढविण्यापेक्षा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचं कुरण चरायला मोकळं केलं गेलं, आणि डॉक्टरांचं भरमसाठ उत्पादन सुरू झालं.. आणि त्यातून अमाप पैसा ओतून जे डॉक्टर झाले, ते एक तर कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन झाले किंवा आपापली हॉस्पिटल्स टाकून हप्ते फेडत बसले..
MBBS साठी पन्नास लाख डोनेशन आणि पुढे PG साठी एक ते दोन कोटी डोनेशन देऊन शिक्षण घेतलेला, चारपाच गुंठ्यांच्या हॉस्पिटलसाठी दीड कोटी आणि बिल्डिंगसाठी एक कोटी मोजलेल्या, आणि सर्व सोयीनींयुक्त हॉस्पिटल टाकलेल्या डॉक्टरला "तू समाजाची सेवा कर" असं तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणणार आहात..? त्याला काय सबसिडाईझड् मिळालंय किंवा मिळतंय की त्यानं समाजाची सेवा करावी..? कोणी चालू केली ही खाजगी मेडिकल कॉलेजेसची दुकानदारी? समाज तेंव्हा चूप का होता? डॉक्टरांची संख्या कमी आहे म्हणून सरकारी सीट्स वाढविण्यापेक्षा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला परमिशन देण्यामागे समाजाचं भलं करण्याचा एक टक्का तरी हेतू दिसतो का कोणाला??
असो..

कमर्शिअल रेटने वीज पाणी वापरायचं, सरकारकडे व्यावसायिक कर भरायचे, पण पेशंटच्या बिलात मात्र कमर्शियलायझेशन करायचं नाही.. सगळ्या मशीनरी महाग आणि त्यातही किमतीच्या जवळपास दीड पट टॅक्स भरायचे, पण बिलात मात्र कमर्शियलायझेशन करायचं नाही..

लोकांना वाटतं डॉक्टर खोऱ्याने ओढतात.. पण खोरे असण्याचे दिवस गेलेत..
प्रत्येक स्पेशालिटीत शंभरात दहाबारा जणच् चांगलं कमवित असतात, आणि समाजाच्या डोळ्यासमोर तेच येतात.. आणि मग जनरलाईझ्ड स्टेटमेंट होते की डॉक्टर लोक खोऱ्याने ओढतात म्हणून..
खरंतर निम्म्याहून अधिक जण हॉस्पिटलचा मेंटेनन्स आणि इन्कम याची सांगड घालायला झगडत असतात..

सरकार दरबारी कुठलीच कामं बिना पैसे देता होत नाहीत.. टेबलावरचा कागद पण हालत नाही.. अक्षरशः एकही परवानगी किंवा सर्टिफिकेट बिना पैसे देता मिळत नाही.. उलट डॉक्टर म्हणलं की चार पैसे जास्तच मागतात पालिकेत.. आणि वर, "तुम्हाला काय कमी आहे राव" असं दात काढून म्हणतात.. तरीही डॉक्टरनी "सेवा"च करायची..

डॉक्टर हा सुद्धा या समाजाचाच भाग आहे.. समाजाची मानसिकता आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी डॉक्टरांत पण प्रतिबिंबित होतातच.. डॉक्टरांची नैतिकता घसरणे, दुष्प्रवृत्ती वाढीस लागणे हे त्याचंच फलित आहे.. समाज मात्र यासाठी डॉक्टरांना एकतर्फी जबाबदार धरतो, आणि स्वतःच्या जबाबदारीतुन अंग काढून घेतो..

अलीकडच्या काळात पेशन्ट फक्त चांगली ट्रीटमेंट दिल्याने खुश होत नाहीत, त्यांना पाहिजे त्या सोयी हॉस्पिटलमध्ये पुरवता पुरवता आधीच नाकी नऊ येतंय.. त्यात ट्रेनड् स्टाफ मिळत नाही, NABH मिळत नाही, कॅशलेस फॅसिलिटी मिळत नाही, रेफरल चार्जेस द्यायचे नाहीत, आणि वर स्वतःची जाहिरातही करायची नाही.. मग छोट्या हॉस्पिटल्सनी ह्या मल्टीस्पेशालिटी आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्स समोर कशी तग धरायची सांगा..?

येणारा काळ हा पूर्णपणे मल्टीस्पेशालिटी कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचा असणार आहे.. पण तोपर्यंत मेडिकल फिल्डचं बरंच चारित्र्यहनन झालेलं असेल.. आणि छोट्या हॉस्पिटल्सचा पूर्णपणे बळी गेलेला असेल..

 डॉ सचिन लांडगे. भुलतज्ञ, अहमदनगर.
.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर आवडल्यास नक्की शेअर करा व इतरांनाही वाचण्याचा आनंद घेऊ द्या.

बुधवार, १५ जुलै, २०२०

जुलै १५, २०२०

Busy Busy काय करता(बिझी बिझी काय करता)

सुंदर कविता 
फोटो share करू शकता या ब्लॉगवरील कोणताही



Busy Busy काय करता

वेळ काढा थोडा

आयुष्यभर चालूच असतो 

संसाराचा गाडा


खूप काम, रजा नाही 

मिटिंग, टार्गेट,फाईल 

अरे वेड्या यातच तुझं 

आयुष्य संपून जाईल


नम्रपणे म्हण साहेबांना 

दोन दिस रजेवर जातो 

फॉरेन टूर राहिला निदान 

जवळ फिरून येतो 


आज पर्यंत ऑफिससाठी

किती किती राबलास

खरं सांग कधी तरी तू

मनाप्रमाणे जगलास ?


मस्त पैकी पाऊस झालाय 

धबधबे झालेत सुरू 

हिरव्यागार जंगला मध्ये

दोस्ता सोबत फिरू 


बायकोलाही म्हण थोडं 

चल येऊ फिरून 

डार्लिंग डार्लिंग खेळू आपण

पुन्हा होऊ तरुण


पंजाबी घाल, प्लाझो घाल

लाऊ द्या लाल लिपस्टिक 

बायकोला शब्द द्यावा

करणार नाही किटकीट


पोळ्या झाल्या की भाकरी 

अन भाकरी झाली की भाजी

स्वयंपाक करता करताच

बायको होईल आजी


गुडघे लागतील दुखायला

तडकून जातील वाट्या 

दोघांच्याही हातात येतील

म्हातारपणाच्या काठ्या 


जोरजोरात बोलावं लागेल 

होशील ठार बहिरा

मसणात गवऱ्या गेल्यावर

आणतो का तिला गजरा ?


तोंडात कवळी बसवल्यावर

कणीस खाता येईल का ?

चालतांना दम लागल्यावर

डोंगर चढता येईल का ?

टाक दोन दिवस रजा,

आरे बाबा हो जागा

हसीमजाक करत करत 

मस्तपैकी जगा


दाल-बाटी,भेळपुरी

आईस्क्रीम सुद्धा खा

आरोग्य उत्तम राहण्यासाठी 

शहरा बाहेर फिरायला जा


Busy Busy काय करता

वेळ काढा थोडा

आयुष्यभर चालूच असतो 

संसाराचा गाडा....

आयुष्यभर चालूच असतो 

संसाराचा गाडा....

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ, 

We are 40+, 50+, 60+, 

सो व्हॉट???💐💐


अब्दुल कलाम सांगून गेले, 

'स्वप्न पहा मोठी'.. 

स्वप्ननगरीत जागा ठेवा

 माधुरी दीक्षित साठी..!💐💐


सकाळी जॉगिंगला जाताना

 पी टी उषा मनात ठेवा,

वय विसरून बॅडमिंटन खेळा, 

 'सिंधूलाही' वाटेल हेवा..!💐💐


मनोमनी 'सचिन' होऊन ,

 ठोकावा एक षटकार ,

घ्यावी एखादी सुंदर तान, 

काळजात रुतावी कट्यार..!💐💐


मन कधीही थकत नसते,

 थकते ते केवळ शरीर असते,

मनात फुलवा बाग बगीचा,

 मनाला वयाचे बंधन नसते...!💐💐


फेस उसळू द्या चैतन्याचा, 

फुलपात्र भरू द्या काठोकाठ,

द्या बंधन झुगारून वयाचे,

 वयाची वृत्तीशी बांधू नका गाठ...!💐💐


*We are 40+, 50+, 60+,*

*so what..?* 💃🕺🤷‍♀🤷🏻‍♂
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 
👨🏻‍🦳👨‍👩‍👧‍👦🙆🏻‍♂ 
पोस्ट आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा व त्यांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या . सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर नक्की शेअर करा धन्यवाद

मंगळवार, १४ जुलै, २०२०

जुलै १४, २०२०

अपघाती_मृत्यू : कायद्यातील तरतूदी Accidental Death & Compensation: (Income Tax Return Required)

*अपघाती_मृत्यू : कायद्यातील तरतूदी*
Accidental Death & Compensation:
(Income Tax Return Required)


जर कोणत्याही व्यक्तिला अपघाती मृत्यु ओढवल्यास आणि ती व्यक्ति सलग मागील ३ वर्षांचे ITR (Income tax return) नोंदणी (फाईल) करत असेल तर त्याला त्या तीन वर्षांचे सरासरी प्रमाणाच्या १० पटीत रक्कम त्याच्या परिवाराला देण्यास सरकारला बंधनकारक आहे.
हा एक सरकारी नियम / लिखीत तरतूद आहे. 
(खाली कायदा सेक्शन नंबर नमूद केला आहे)

उदाहरण दाखल: अपघात झालेल्या माणसाची मागील ३ वर्षांची वार्षिक मिळकत आय : ४ लाख, ५ लाख, ६ लाख असा असेल.
तर त्या ३ही वर्षांचे सरासरी होणार ५ लाख रूपये आणि त्याच्या १०पट म्हणजेच ५० लाख रूपये सरकार कडून घेण्याचा अधिकार प्रत्येक आयटिआर भरणार्या व्यक्तिच्या परिवाराला आहे.

बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही
पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे.
मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.

जरी सलग ३ वर्ष ITR returns दाखल केले नसेल तर, परिवाराला पैसा मिळणार नाही असे काही नाही; पण अशा परिस्थितीत सरकार कडून एखाद दिड लाख देऊन केस बंद केली जाते. पण जर ३ वर्षाचे सलग फाईलींग नोंद असेल तर ह्या स्थितीत बाजू आणखीन बळकट बनते आणि असे समजले जाते की मयत व्यक्ति त्या परिवाराची कमवणारी व्यक्ति होती. जर ती जिवंत राहीली असती तर त्याच्या परिवाराला ती पुढील १० वर्षामध्ये आताच्या वार्षिक आयच्या १० पट कमवले दिले असते आणि कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषणही केले असते.

आपल्यापैकी नोकरी (सर्विस) करणारे बरेच लोग आहेत आणि ते कमवणारे सुद्धा आहेत परंतू , त्यातील बहुतांशी लोक ITR (Return filing) नोंदवत नाही. 
अशाने कंपनीद्वारे कपात केलेला हक्काचा पैसा सरकार कडून आपण परत घेत नाही आणि तसेच अशा अपघाती मृत्यूनंतर परिजनांना आपल्या पछ्यातही काही आर्थिक लाभ नाही.

माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत अपघाती मृत्यू अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे. 

Source - *Section 166 of the Motor act, 1988 (Supreme Court Judgment under Civil Appeal No. 9858 of 2013, arising out of SLP (C) No. 1056 of 2008) Dt 31 Oct 2013.*
-----------------------------------------------------------------------

टिप: सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो. जर आपण आता पर्यंत नोंदणी केली नसल्यास, एकत्रित 2 ही वर्षाचे पण फायलिंग करू शकता





*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 
👨🏻‍🦳👨‍👩‍👧‍👦🙆🏻‍♂ 
पोस्ट आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा व त्यांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या . सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर नक्की शेअर करा धन्यवाद