वनभोजनं*
*एक आठवण*
मी कोकणातील माझ्या गावी इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असताना आणि त्यानंतरही दर वर्षी शाळेनं जी वनभोजनं आयोजली ती आज माझ्या मनावर हळुवार मोरपीस फिरवतात तर कधी वर्ग मित्रांच्या आठवणीनं मला भावूक करतात.
त्याकाळी आर्थिक सुबत्ता नव्हती,डामडौल नव्हता.
साऱ्या गोष्टी मर्यादेनं चालत. प्राथमिक शाळेत शिकत असताना शाळेचा विशेष असा आम्हाला गणवेश नव्हता.
परिधान केलेले कपडे स्वच्छ असले की झालं, शाळेचा असा दंडक होता.
आम्ही मुलं पायल कंपनीचं हवाई चप्पल घालून शाळेत यायचो त्यावेळी त्याची किंमत होती केवळ साडेपाच रुपये. काही मुलं बिचारी अनवाणी शाळेत येत.
आम्हाला लाभलेले सर्व शिक्षक हे हाडाचे शिक्षक होते. सर्व मुलांकडून छान अभ्यास करवून घेतला जाई. अभ्यास,मैदानी खेळ आणि शिस्त ही तीन अंगं जी विद्यार्थ्यांचं वास्तव आणि भावी जीवन यशस्वी करतात,घडवतात या तिन्ही अंगांचं मुलांकडून काटेकोरपणानं पालन होई.अपराध्यास कडक शासन हे ठरलेलं असे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकांचं बारीक लक्ष असे.
एखादा विद्यार्थी फार दिवस शाळेत आला नाही तर शिक्षक तडक त्याच्या घरी जाऊन त्याची आस्थेनं चौकशी करत,'आपले गुरुजी आपल्याला भेटायला घरी आले आहेत ' हे पाहून तो विद्यार्थी भारावून जायचा. यामुळे आपल्या गुरुजीं प्रती त्या मुलाचं प्रेम अधिक दृढ व्हायचं.
वनभोजनाची वर्गणी २५ ते ५० पैशांच्या घरात असे. ही वर्गणी सोडून आम्हाला वनभोजनासाठी घरातून २५ पैशाचं नाणं मिळे आणि आम्ही बालचमू खुश होत असू. इतर वेळेला आम्हाला जत्रेला पैसे मिळत तेही फार तर एक रुपया.
वनभोजन कुठे जाणार आणि कोणत्या दिवशी जाणार याची एक आठवडा आधी शाळेकडून घोषणा होई. आम्ही मुलं आईच्या मागं मागं फिरून वनभोजनासाठी कोणता पदार्थ करायचा याचं गणित मांडायचो. वनभोजनाची तारीख ठरल्यानंतर ते जाण्या आधी एक आठवडा अगोदर आम्ही एका वेगळ्याच विश्वात तरंगायचो. सर्व मुलांची मनं प्रफुल्लीत झालेली असायची.
शाळेत वनभोजनाचे जोरदार वारे वहात अन त्यावर आम्हा मुलांच्या गुजगोष्टी चालत.
डब्यातून कोण काय आणणार यावर खमंग चर्चा होई.
आमचा एक वर्ग मित्र महानंद त्याचं नाव, तो वनभोजन असं न म्हणता "वनभजन" म्हणायचा.
आम्ही त्याला कैक वेळा सांगून पाहिलं "अरे! वनभोजन म्हण रे, तू वनात जावन काय थयसर टाळ घेवन भजन करतलय की काय?" तरीही तो आपला हेका सोडत नसे. मुळात तो खट्याळ होता आणि आम्हाला खिजवण्या साठी तो मुद्दाम वनभोजनाचा विषय उकरून काढून वनभजन म्हणायचा.
वनभोजनाचा तो दिवस उजाडायचा. येऊ घातलेल्या वनभोजनाच्या अत्याधिक आनंदानं आदल्या दिवशी लवकर झोप येत नसे.
झोप लागल्यानंतर मधे मधे जाग यायची. पहाटे कोंबडा आरवला की आई उठून माझ्या साठीच्या मेनुच्या तयारीला लागायची.
मीही उठायचो तर ती " अरे! इतक्यात कशाक उठतय? अजून वेळ आसा तुका मी उठयतय" असं ती म्हणायची आणि ओशाळून जाऊन मी माझं अंग बळेबळेच अंथरुणात ढकले.
आईनं हाक मारल्या नंतर सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आटोपून घरात केलेल्या वनभोजना साठीचा मेनूचा डबा घेऊन मी आणि इतर मुलं शाळेत हजर व्हायचो.
कोणी कोणी काय आणलंय यावर पुन्हा अल्पकालीन चर्चासत्रं झडायची. सर्रास सगळीच मुलं तांदळाचे घावणे व बटाट्याची पिवळी भाजी घेऊन आलेली असत.
बऱ्याच मुली लाल रिबननं घट्ट बांधलेल्या वेणीवर केवडा माळून येत तर काही मोगरा, आबोली,शेवंती,सुरंगं (बकुळीची फुलं) इत्यादी फुलांचे गजरे व नागचाफा, भुईचाफ्याची फुलं माळून येत त्या सुगंधाच्या घमघमाटानं अख्खी शाळा भरून न्हाऊन निघे.
वनभोजनाला निघायची वेळ होई.
श्री. म्हाडेसर गुरुजी दोन रांगात सर्वांना उभं करून "सावकाश चालत आम्हा सर्वांना अमुक ठिकाणी जायचं आहे. दंगामस्ती करायची नाही, शांततेनं जायचं यायचं आहे जर दंगा करताना कोणी सापडला तर मला माहित नाही " असं आपल्या हातातील छडी उंचावुन ते सांगत. आमचं ते रांगेनं शिस्तबद्ध चालणं आणि साने गुरुजींच्या कविता म्हणणं
*"बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले ,जनसेवे जीवन दिधले,राष्ट्रात प्राण हे उरले....."*
हे पाहून आजूबाजूला असलेली माणसं कुतूहलानं आमच्या कडॆ पहात राहात
"शाळेचां वनभोजन जाताहासां दिसता " असं आपापसात कुजबुजत.
आम्हा मुलांची वनभोजनाची ती रांग आजही माझ्या डोळ्यां समोर उभी राहाते व अंगावर रोमांच उभे करते.
इच्छित स्थळी पोहोचल्या नंतर आपापले डबे एकत्र ठेवा असं फर्मान निघे.
त्यानंतर शिस्त बद्ध रीतीनं ओळीनं आम्ही मुलं नदीवर जावुन हातपाय स्वच्छ धुवून परत यायचो. त्यानंतर छोटासा सांस्कृतीक कार्यक्रम सादर होई या अंतर्गत कोणी नकला करी,कोणी गाणं म्हणे,एखादा विद्यार्थी गोष्ट सांगे तर कोणी जादूचे प्रयोग दाखवी. खूप खूप मजा यायची. माझा चुलत भाऊ नृत्य करत किशोर कुमारचं गाणं म्हणे *"दुनिया हसे हसती रहे, मै ही गवार मुझे सबसे है प्यार "*
पण
मला ही अशी गाणी सर्वांसमोर म्हणणं जमत नसे नृत्य तर बाजूलाच राहिलं.
माझ्या भाऊला नृत्य करत गाणं म्हणताना बघुन श्री.भिषे गुरुजी मला ओढून बळेबळेच सर्वां समोर घेऊन जात मग मी माझ्या चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील *"वनी खेळती बाल ते बल्लवांचे,तुरे खोवती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालती दिव्य हार "* ही तोंडपाठ केलेली कविता म्हणायचो.
दुपार व्हायची आणि चला आपापले डबे घेऊन गोलाकार रांगेत बसा असा श्री.बिजली गुरुजींचा आदेश निघे.
का कुणास ठाऊक मी वनभोजनाला कायम साबुदाण्याची खिचडी घेऊन जायचो.
मला ती खूप आवडे आणि आजही पूर्वी इतकीच आवडते.
इतर मुलांत माझा एकट्याचाच मेनू वेगळा असायचा.
एकदा मी म्हाडेसर गुरुजींना थोडीशी खिचडी वाढली तर ते म्हणाले,"अरे! नांगरे,आज आहे बुधवार. तू बुधवारचा उपवास करतोस काय रे? खिचडी आणलास म्हणून विचारलं "
तेव्हा मला कळलं की साबुदाण्याची खिचडी उपवासाला खातात ते. *आज ज्या ज्या वेळी मी खिचडी खातो त्या त्या वेळी पूज्य म्हाडेसर गुरुजींची मला सय येते.*
आज गुरुजी कुठे बरं असतील? ते हयात असतील काय? या विचारानं जीवाची घालमेल होते.
सूर्य पश्चिमेला कलायला सुरुवात झालेली असायची आणि सातवी इयत्तेची मुलं चहा बनवायच्या तयारीला लागायची.
सर्वांचं चहापान झाल्या नंतर *वंदे मातरम* या राष्ट्र गीतानं वनभोजना ची सांगता होई.
पुन्हा शांततेनं मनोमनी आनंदानं चिंब भिजुन जात आमचा परतीचा पायी प्रवास सुरु व्हायचा.
घरी येऊन पोहोचायला बराच वेळ लागे. काहीसा अंधुक अंधार झालेला असायचा
आणि
माझी आई आणि धाकटी बहिण घराच्या कुंपणाच्या बाहेर येऊन माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली मी पहायचो.
वनभोजनाच्या त्या आठवणी मनाच्या कप्प्यात आजही बंदिस्त आहेत *त्या आजीवन तशाच राहातील.*
😊🙏🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..