*"रेडिओ"*
*तुमचा..माझा..आपल्या सर्वांच्या मनातला..*
*एक आठवण..*
आज खूप दिवसांनी मला आमच्या
*फिलिप्स रेडिओ* ची आठवण झाली.
आठवण एवढ्याचसाठी म्हटलं..आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं एक वेगळं स्थान होतं..कारण त्या रेडिओच्या जमान्यात आपण लहान होतो आणि रेडिओ आपल्या घराचा कुटुंबाचा एक सदस्य होता.
माझ्या लहानपणी मला नक्की आठवतंय..मी तिसरीला होतो तेव्हापासून आमच्या घरात
*रेडिओ* होता.
*फिलिप्स* कंपनीचा तो रेडिओ..त्याला चामड्याचं एक भक्कम कव्हर होतं..आणि गळ्यात अडकावायला त्याला चामड्याचा एक पातळ पट्टा होता.
घरात आमचा मुलांचा हात पोहोचणार नाही अशा ठिकाणी लाकडी खुंटीला त्याचे स्थान असायचे.
आमचा हा रेडिओ शेलावर चालायचा..एकाचवेळी तीन शेल टाकावे लागायचे..तेव्हा
*एव्हरेडी* आणि *निप्पो* कंपनीचे शेल मिळायचे..एव्हरेडीच्या त्यावरचं काळं मांजर ९ च्या आकड्यातून उडी मारताना अजूनही डोळ्यासमोर आहे..काही दिवसांनी हे शेल उतरायचे म्हणजे त्यांची पावर संपायची मग हे शेल आम्हाला गाडी गाडी खेळायला मिळायचे.
आमच्या रेडिओला खालच्या बाजूला एक चालू-बंद करण्याचे व आवाजाचे असे एकच बटन होते..त्याच्यावरती केंद्र बदलवण्याचे एक बटण असायचे..वरच्या बटनाच्या फिरवण्यानुसार एक काचेच्या आत असणारी लाल पांढरी काडी मागे पुढे व्हायची..व त्यानुसार कार्यक्रम बदलायचे.
रेडिओला पाठीमागून एक छोटा खटका होता त्याला आम्ही बँडबटन म्हणायचो..तो खटका मागे-पुढे केला कि आम्हाला न समजणाऱ्या भाषा ऐकू यायच्या..मग त्यामुळे आम्ही त्या खटक्याला सहसा हात लावत नसायचो.
पहिले दोन-तीन वर्ष मला कुणी रेडिओला हात लावून दिल्याचे आठवत नाही,पण मला कळायला लागलं आणि माझा हात खुंटीला पोहोचला तसा घरातला रेडीओ माझा दोस्त बनला..मी सहावीला गेल्यानंतर मग मी घरात असताना कुणाला रेडिओला हात लावून देत नव्हतो.
सकाळी ६ वाजता एका विशिष्ट धुनने घरातील रेडिओ चालू व्हायचा..एक मिनिटाची ती धून बंद होताच
*वंदे मातरम्’* सुरु व्हायचं अन मग दिल्ली केंद्रावरुन प्रक्षेपित होणार्या व पुणे केंद्राहून सहक्षेपित हिंदी बातम्या प्रसारित व्हायच्या..
"ये (थोडा श्वास घ्यायचा..मग ) आकाशवाणी है" अब देवकीनंदन पांडे से समाचार सुनिये" हा आवाज तेव्हा *देशाचा आवाज"* झाला होता.
मग *प्रभात वंदन* व लगेच भक्तीगीतांचा कार्यक्रम सुरु व्हायचा..
*पंडित भीमसेन जोशी* यांची "भेटी लागी जीवा लागलेसी आस..पाहे रात्रंदिवस वाट तुझी..भेटी लागी जीवा लागलेसी आस" किंवा मोठी ताण आवळत "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.."अशी भक्ती गीते ऐकू येऊ लागताच माणसं जागी होऊ लागायची..
*घनश्याम सुंदरा,श्रीधरा अरुणोदय झाला..उठी लवकर वनमाळी..* या भूपाळीने आणि
*लता मंगेशकर* यांची "रंगा येई वो रे..विठाई विठाई माझी कृष्णाई..कान्हाई" किंवा “पैल तोहे कावू कोकताहे,शकून गे माहे सांगताहे..पैल तोहे कावू कोकताहे."अशी अनेक गाणी ऐकत आमची माय अंगणात सडा-सारवन करायला सुरुवात करायची..आम्ही गोधडीत असतानाच हे सारं ऐकायचो..गोधडीत असतानाच ही गाणी ऐकत ऐकतच आम्ही मोठ्ठं झालो..अन नकळत अध्यात्माचे संस्कार आमच्यावर घडून गेले..सकाळी ६.५५ ला
*संस्कृत बातम्या* चालू व्हायच्या..दररोज ते सुरुवातीचं पठण ऐकून..
*"इयं आकाशवाणी | संप्रति वार्ता: श्रूयन्ताम् | प्रवाचकः बलदेवानन्द सागरः* हे आमचं पाठ झाल होतं..पुढे आम्ही कॉलेजला जाईपर्यंत किती तरी वर्षे तोच आवाज होता.
सकाळी ७ वाजता ५ मिनिटांच्या हिंदी बातम्यांच्या सुरुवातीला बातमीदार एक आवंढा गिळून
*"ये (थोडा श्वास घ्यायचा मग) आकाशवाणी है..अब सुब्रम्हन्यमस्वामी से समाचार सुनिये* अशी घराघरात आकाशवाणी व्हायची..
बरोब्बर ७ वाजून ५ मिनिटांनी घोषणा ऐकू यायची..
*"आकाशवाणी पुणे.. सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत..ठळक बातम्या"*
असं त्यांनी म्हटले की बरोबर आमचा शाळेत जायचा टाईम व्हायचा..
कधी कधी सकाळी शाळेला उशीर होतोय असं वाटल्यानं आई म्हणायची.."आवर मेल्या" तर मी तिला म्हणायचो..अजून बातम्या नाही लागल्या..असं रेडिओवर आमच्या वेळा चालू व्हायच्या.
सकाळी १०.३० नंतर कामकरी कष्टकरी समाज कामावर गेलेला असायचा तेव्हा प्रत्येक ठिकाणी रेडीओ असायचा.
११ वाजता आकाशवाणी मुंबई ब केंद्रावरुन कामगार सभा हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम लागायचा.. त्याकाळी
*शाहीर दादा कोंडके* याचं लोकप्रिय झालेलं "मळ्याच्या मळ्यामधे कोण गं उभी" आणि
"अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान" हि गाणी ऐकून ऐकून आम्हा पोरांची ती गाणी तोंडपाठ झाली.
दुपारी १२ वाजता
*माजघरातल्या गप्पा* हा कार्यक्रम चालू झाला कि त्या प्रत्येकाला त्या गप्पा आपल्या घरातल्या गप्पा वाटायच्या..कष्टकरी समाज यावेळी काम करत करत हे मन लावून ऐकायचा..
*सरुबाईंचा सल्ला* हा घरातील वडिलधाऱ्या मंडळीने दिलेला सल्ला वाटायचा.
संध्याकाळी ६.३० वाजता
*कामगारांसाठी* असा पुन्हा एक विरुगंळ्याचा कार्यक्रम लागायचा..त्यात लोकसंगीत,लोकगीतं, कोळीगीत,भारुडे,अशा गाण्यांचा भरणा असायचा..
*शाहीर विठ्ठल उमप,अनंत फंदी* यांची कितीतरी गाणी त्यावेळी ऐकलीय.. "बिकट वाट वहिवाट नसावी,धोपट मार्गा सोडु नको..संसारामधी असा आपला,उगाच भटकत फिरु नको" हे गाणं आजही कानात गुणगुणतयं.
संध्याकाळी ७.३० ला शेतकऱ्यांसाठी दररोज एक *आपली शेती* नावाचा अर्ध्या तासाचा प्रायोजित कार्यक्रम लागायचा..लहान असल्यानं शेतीतील कार्यक्रमाचा काहीच कळायचं नाही पण
*"झुळझुळ पाणी आणायचं कुणी?..सांगतो राणी..फिनोलेक्सनं आणलं पाणी,शेतं पिकली सोन्यावाणी.. फिनोलेक्स*..हि मध्येच वाजणारी जाहिरात बरोबर म्हणायचो.
संध्याकाळी ७ वाजता पुणे केंद्रावरुन *मराठी बातम्या* लागायच्या.. बातम्यांची वेळ झाली कि, शेजारीपाजारी गल्लीतले ज्यांच्याकडे रेडिओ आहे त्यांच्या अंगणात गोळा व्हायचे आणि बातम्या ऐकत बसायचे..त्यावेळी प्रसारमाध्यमाचं रेडिओ हे एक प्रभावी साधन होतं.
त्यानंतर घरातील लोकांची जेवणं व्हायची तोपर्यंत ९ वाजलेले असायचे मग "नभोवाणी आणि मित्रमंडळ सादर करत आहे *एक नाटिका*" असा एक श्रवणीय अर्ध्या- एक तासाचा नाट्यप्रयोग लागायचा..ते ऐकत असताना आपण प्रत्यक्ष ते नाटक अनुभवतोय असा भास व्हायचा.
तोपर्यंत घरात किंवा अंगणात गाद्या-गिरद्या, गोधड्या,वाकळ असं काही बाही टाकून झोपण्याची तयारी केलेली असायची अन नेमकं त्याच वेळी जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम चालू व्हायचा..मग मोकळ्या हवेत अंथरुणावर लोळत पडत ही सुमधुर श्रवणीय गाणी ऐकत कधी झोपी जायचो ते कळतपण नसायचं.
रेडिओच्या खुप आठवणी आपण साऱ्यांनीच जपल्या आहेत..निर्जीव असला तरी घराघरातील तो एक हक्काचा आपलेपणाचा सदस्य होता..एकवेळ आपण चुकू पण तो कधीच चुकत नव्हता..अचूकता तर इतकी की,
"३७८ अंश ७-८ मीटर्स अर्थात ७९२ किलोहर्ट्झ" वर ऐकू येणार्या आकाशवाणी पुणे केंद्रातून "सकाळचे ७ वाजून ५५ मिनिटं आणि १८ सेकंदं झाली आहेत" हा सकाळच्या आवाजाचा तपशील आजही कानात अन मनात घट्ट बसलाय..
*आमच्याकडे विड्यांचा व्यवसाय प्रत्येक घरात चालायचा..त्याकाळी आमच्या गल्लीत सकाळच्या प्रहरी महिला बाहेर कोवळ्या उन्हात येऊन पानं कापणे,विडया वळणे व विड्यांना दोरा बांधणे ही कामे करीत. समोर रेडिओ ठेवलेला असायचा.."स्वये श्रीरामप्रभु ऐकती..कुश लव रामायण गाती..कुश लव रामायण गाती...” ग. दि. माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी सादर केलेला आणि वर्षभर चाललेल्या गीतरामायणाची धून घराघरातून ऐकू यायची..ते सादरीकरण इतकं प्रभावी असायचं कि प्रत्यक्षात काही जण ते ऐकत असताना भावूक व्हायचे..काही डोळ्यांच्या कडा पुसायचे.*
दर बुधवारी रात्री ८ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी
*बिनाका गीत माला* हा कोणतं गाणं या आठवड्यात किती नंबरला आहे..? याबाबतचा एक तासाचा कार्यक्रम लागायचा..त्यात ते अमिन सयानींचे निवेदन-"भाईयो और बहेंनो,तो चलो देखते है, इस हप्ते में पायदान नंबर चार पे कौनसा गाना है..?
हे असं त्यांनी म्हटलं कि, आमच्या मुलांच्या त्या गाण्यावरुन पैजा लागायच्या..कोण जिंकतंय कोण हरतयं यापेक्षा आपला अंदाज बरोब्बर आल्याचा आनंद अधिक असायचा..
*अमीन सयानी* म्हणजे प्रत्येकाला आपल्या घरातील माणूस वाटायचा..इतकं जिवंत ते सादरीकरण कानाला अन मनाला भावायचं.
असाच रात्री ९ वाजता प्रसारित होणारा आणखी एक साप्ताहिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम..
*आपली आवड*.. ज्यात पत्राने लोक मराठी गाणी आकाशवाणी केंद्राला कळवायचे आणि मग ज्या गाण्यासाठी जास्त पत्रं आलीत ती गाणी मग आपल नावं घेवून त्या कार्यक्रमात लावली जायची.
सूर्य मावळतीला गेल्यावर संध्याकाळी सांजधारा म्हणून एक भावगीतांचा कार्यक्रम चालू व्हायचा.."अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती" किंवा "संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखाची जाणीव तिजला नाही.. संथ वाहते कृष्णामाई" ही आणि अशी अनेक अरुण दाते आणि सुधीर फडके यांनी गायलेली भावगीते आजही मनात घर करून उभी आहेत.
दुपारी १२ वाजता नाट्यगीतांचा कार्यक्रम असायचा तो सुरु झाला कि,आमच्या डोळ्याला तार यायची..घरातील मोठी माणसं ते ऐकतच दुपारची वामकुक्षी घ्यायचे.
रविवारी सकाळी ९ वाजता मुंबई केंद्रावर “बालदरबार” हा एक तासाचा आमच्या आवडीचा कार्यक्रम लागायचा..आम्ही गल्लीतील मित्र मैत्रिणी रेडिओच्या भोवती गोल बसून तर काही तोंडाची हनुवटी दोन्ही हाताच्या पंज्यावर ठेवून पोटावर पसरुन हा कार्यक्रम ऐकायचे.
असाच एक ९.३० वाजता रेडिओवर 'गम्मत-जम्मत' हा लहान मुलांचा कार्यक्रम लागायचा.."'गम्मत जम्मत. या या या गम्मत जम्मत. ऐका हो गम्मत जम्मत. या या या ढिण्चॅक ढिण्ण, ढिण्चॅक ढिण्चॅक ढिण्ण" अशी त्या कार्यक्रमाची सुरुवात सुरु व्हायची..त्यातलं शेवटचे 'गम्मssत जम्मssत' हे शब्द कानावर आले कि, आम्ही मुलं हात वर करून ते शब्द त्या रेडिओसोबत म्हणायचो.
पुढे कॉलेजला गेल्यावर कार्यक्रमाची आवड बदलली..पण रेडिओची आवड तशीच राहिली, मग त्याकाळी रात्री ११ वाजता विविध भारतीवर जुनी गाणी लागायची ती गाणी ऐकता ऐकता कधी झोप लागायची तेही कळायचं नाही.
क्रिकेट समजायला लागल्यावर जेव्हा कधी भारताचा सामना वेस्टइंडिजबरोबर असेल त्यावेळी रेडिओची क्रेझ वाढायची.. तेव्हा घरात टिव्ही असणारे खूप कमी प्रमाणात होते.ज्यांच्याकडे रेडिओ नाही ते सर्व मित्र एकत्र गोळा होऊन माझ्याकडे यायचे किंवा ज्यांच्याकडे रेडिओ आहे तिथे सामना सुरु होण्यापूर्वीच जमायचे..
मग आम्ही ते सामन्याचं ‘धावतं वर्णन’ "आँखो देखा हाल" अर्थात "कॉमेंट्री" रेडिओवर ऐकायचो.. धावतं वर्णन करणारा अगदी रसभरीत वर्णन करीत असल्यामुळे डोळ्यांसमोर संपूर्ण चित्र उभं राहायचं..
"बीस या बाईस कदमोंका लंबा रनअप" असं म्हटलं रे म्हटलं की डोळ्यांसमोर हातात चेंडून घेऊन धावणारा तो माल्कम मार्शल डोळ्यापुढे उभा रहायचा..और गेंद को सिधी दिशा से खेल दिया है मिडॉन की तरफ एक रन के लिये..फिर अगली गेंद गावसकर के लिये..और बहोतही शानदार ढंग से खेला है इस गेंद को बंदूक से निकली गोली की तरह गेंद बाऊंड्री लाईन के बाहर” असं म्हटलं की अत्यंत वेगाने सीमारेषेकडे जाणारा चेंडू दिसायचा..आणि आम्ही सारे चक्क मैदानात असल्यासारखे ओरडायचो..”फोर्ररन..
षटक संपायचं..कपिलदेव बँटिंगला आलेला असायचा..
ओव्हर की पहली गेंद..मायकेल होल्डींग के गेंद का सामना कर रहे है, कपिलदेव --“और ये..??"..
असं म्हणून थबकणारा धावत वर्णन करणाऱ्याचा आवाज हृदयाची धडधड वाढवायचा..नक्की काय होतंय ते कळायला मार्ग नसायचा कारण प्रत्यक्षात स्टेडीयमवर असलेल्या लोकांचा आवाज पार आमच्या रेडिओमधून बाहेर यायचा..गलका थांबेपर्यंत मध्ये घेतलेली ही क्षणभर विश्रांती आम्हांला पोटात गोळा आणायची..
बहुतेक ‘आऊट’ असंच आमच्या सर्वांच्या मनात यायचं..आणि त्याचवेळी "ये लगा सिक्सर’’.. "बॉल सिधी बॉन्ड्री लाईन के उपर से दर्शको में"..असे काहीतरी शब्द यायचे आणि जीव भांड्यात पडायचा.
*चित्रलोक* हा नव्या हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम सकाळी ८.३० वाजता प्रसारित होत असे.. यामुळे मी ८०-९० च्या दशकातील हिंदी गाण्यांचा चाहता झालो..आणि आजही आहे.
तुमच्याही रेडिओच्या काही आठवणी नक्की असतील..या आणि अशा कितीतरी रेडिओच्या आठवणी मनात आजही घर करून उभ्या आहेत..
खरं सांगायचं तर रेडीओ एकेकाळचा सखा आज अडगळीत गेलाय..आणि मनाचा तो रसिक कोपरा सुना झालाय..रेडिओची जागा टिव्हीने घेतली पण टिव्हीवरची गाणी श्रवणीय होण्यापेक्षा प्रेक्षणीय होत गेली डोळे सुखावले पण कान आणि मन मात्र त्या जुन्या आठवणीत गुरफटून राहिले..
एकीकडे *रेडिओ* अडगळीत पडलाय असं म्हणणारे लोक आहेत तर दुसरीकडे वाढत जाणारे FM रेडिओ स्टेशन्स आणि लाखभर पगार घेणारे RJ देखील आहेत..👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..