लेखिका : प्रणाली मराठे - धुळे.
9970955255
सामाजिक परिवर्तनाच्या प्रणेत्या
अहिल्याराणी होळकर
महाराष्ट्राला क्रांतिकारी स्त्रियांची गौरवशाली परंपरा लाभलेली आहे.यामध्ये राजमाता जिजाऊ, राणी येसूबाई,ताराराणी, राणी चाँदबीबी,राणी अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करणारी पहिली महिला डॉ. रुखमा राऊत, स्त्रीपुरुष तुलनाकार लेखिका ताराबाई शिंदे, पहिली वृत्तपत्र संपादिका तानूबाई बिर्जे,मुक्ता साळवे यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. अहिल्याराणींची राजकीय कारकिर्दसुद्धा अशीच गौरवशाली आहे.
अठराव्या शतकात शिक्षणाला आणि माणूसकीच्या हक्कालाही पारख्या झालेल्या स्त्रियांना लढाईचे शिक्षण देऊन स्वतंत्र फौज निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे ३१ मे १७२५ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे आणि आईचे नाव सुशिलाबाई. वयाच्या आठव्या वर्षीच समाजातील रितीरिवाजानुसार खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्याबाई यांचा विवाह झाला.अहिल्याबाईंचे सासरे मल्हारराव होळकर हे अतिशय शूर, कर्तबगार आणि उदार होते. आपल्या सुनेच्या अंगी असलेले गुण त्यांनी हेरले. मल्हाररावांनी अहिल्याबाईंना लेखन-वाचन, दांडपट्टा चालविणे, युद्धाचे व राज्यकारभाराचे डावपेच आखणे,तह करणे,करवसूली, न्यायदान, पत्रव्यवहार इत्यादींचे धडे दिले.
वयाच्या २९व्या वर्षी पती खंडेरावांना रणांगणावर वीरमरण आले. रणांगणावर खंडेरावांना मृत्यू आल्याचा सार्थ अभिमान अहिल्याबाईंना होता. पतीचे निधन झाल्यावर त्यावेळी सती जाण्याची प्रथा होती. सती जाणे हे धार्मिक दृष्टीने पवित्र मानले जायचे.परंतु अहिल्याबाई हया पती निधनानंतर सती गेल्या नाहीत. त्यांचा हा निर्णय त्या काळात टाकलेले धाडसी पाऊलच म्हणावे लागेल. खंडेरावांच्या निधनानंतर श्राद्धादिक विधीच्या वेळी ब्राह्मणांनी सती गेलेल्या मुस्लीम बायकांची नावे घेऊन पळीने पाणी सोडण्यास नकार दिला. तेव्हा अहिल्याबाई म्हणाल्या की, नाती काय धर्मानेच बनतात काय? चराचरात ईश्वर पाहायला धर्म सांगतो. ज्या स्वामीमागे जळून खाक झाल्या त्यांच्या नावे दोन पळ्या पाणी सोडणे जमत नसेल तर बंद करा तो श्राद्धविधी अशा कडक शब्दांत त्यांची कान उघाडणी करुन अहिल्याबाईंनी आपल्या सर्वधर्मसमभाव आणि धर्म सहिष्णूतेच्या वृत्तीचा परिचय दिला.
प्रथम पती मग सासरे मल्हारराव होळकर आणि नंतर एकुलता एक मुलगा मालेराव याचे निधन झाल्यानंतर ब्राह्मण मंत्र्यांनी अहिल्याबाईंना काशीला जाऊन पापक्षालन करण्याचा सल्ला दिला. अहिल्याबाईंनी त्यांचे न ऐकता आपला विश्वासू सेवक तुकोजी होळकर यांस दत्तक घेऊन राज्य कारभाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. मे १७६७ मध्ये स्वतः राज्य कारभार हाती घेऊन विस्कळीत झालेली राज्याची घडी व्यवस्थित बसविली.राज्याची राजधानी इंदोरहून महेश्वरला हलविली. महेश्वर येथील वस्त्रोद्योग कामगारांना आर्थिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देऊन वस्त्रोद्योग भरभराटीस आणला.
आधुनिक तंत्र - विज्ञानाच्या एकविसाव्या शतकात आजही आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांम्पत्यास आणि त्यांच्या कुटुंबास वाळीत टाकले जाते. समाजातील सामाजिक कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रमात त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो. अहिल्याबाईंनी मात्र पुरोगामी व आधुनिक विचारसरणी जोपासून त्यांच्या राज्यातील चोर -दरोडेखोरांचे समूळ उच्चाटन करणाऱ्या पराक्रमी वीर यशवंतराव फणसे यांच्याशी आपल्या एकुलत्या एक मुलीचा मुक्ताबाईचा आंतरजातीय विवाह लावून दिला. सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आपल्या घरापासून करणाऱ्या अहिल्या राणी खरोखरच क्रांतिकारी ठरतात.
जातीय भेदभावास होळकर संस्थानात मुळीच स्थान नव्हते. उच्च-नीचतेचे उच्चाटन करुन न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आधारित असे सामाजिक आणि धार्मिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न अहिल्याबाई यांनी केला.स्त्रियांना लढाईचे शिक्षण आणि मूल दत्तक घेण्याचा महत्त्वपूर्ण हक्क देणाऱ्या अहिल्याबाई हया एक सक्षम आणि दूरदृष्टीच्या राज्यकर्त्या होत्या.स्त्रियांनी राजदरबारात पडदा प्रथा न पाळण्याचा पायंडा त्यांनी घातला.स्वतः दोनच अपत्यांना जन्म देऊन लहान कुटुंबाचा आदर्शही त्या काळात त्यांनी समाजासमोर ठेवला.
कित्येक मंदिरे, मशीद, दर्गे, विहार यांना देणग्या देऊन त्यांच्या जिर्णोद्धाराचे कामही अहिल्याबाई यांनी केले. अनेक मुस्लिम मौलवी व फकिरांना त्यांनी जमिनी, घरे वंशपरंपरेने मिळत राहण्याच्या सनदा बहाल केल्या होत्या. देशाच्या सर्व भागात त्यांनी पायविहीरी,तलाव बांधले जे सर्व जाती-जमातींसाठी खुले होते. प्रजेचे हित यातच आपले हित आहे असे मानून अहिल्याबाईंनी अनेक लोकोपयोगी कामे केली. जी आजही सुस्थितीत आहेत.
अनेक क्रांतिकारी निर्णय अहिल्याबाईंनी त्यांच्या कार्यकाळात त्यावेळी घेतले. अपत्यहीन विधवांची धनसंपत्ती जप्त करण्याचा नियम रद्दबातल करुन त्यांनी विधवांना मूल दत्तक घेण्याचा आणि आपल्या धन संपत्तीचा हवा तसा विनियोग करण्याचा नवीन नियम केला. नियमबद्ध न्यायालयांची मुहूर्तमेढ अहिल्याबाईंच्या होळकर संस्थानातच रोवली गेली. जर न्यायदानाने कुणाचे समाधान झाले नसेल तर त्या स्वतः न्यायदान करीत असत. न्याय देतांना तो पूर्णपणे निपक्षपाती दृष्टिकोनातूनच दिला जात असे.
शेतकरी हाच साऱ्या जगाचा पोशिंदा आहे.म्हणून अहिल्याबाईंनी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण केले. दुष्काळात शेतसारा माफ करुन शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सवलती देऊन शेतीचा विकास घडवून आणला. राज्यात रस्ते, पूल, घाट,धर्मशाळा,तलाव व विहिरींची निर्मिती करुन बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊन लोककल्याणकारी कामे केली. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यात पडित जमिनीवर आणि रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली. आपल्या प्रत्येक कृतीतून अहिल्याबाईंनी एक नवा आदर्श निर्माण केला.
अशाप्रकारे परिवर्तनाची सुरुवात आपल्या राज्यापासून नव्हे तर आपल्या घरापासून करणाऱ्या, प्रजेच्या हितातच आपले हित आहे असे मानणाऱ्या, काळाच्याही कित्येक पावले पुढे असणाऱ्या वीरांगना अहिल्याबाई होळकर यांचे १३ ऑगस्ट १७९५ रोजी निर्वाण झाले आणि एका क्रांतिकारी आदर्श राजकीर्दीची अखेर झाली. अहिल्यबाईंची संपूर्ण क्रांतिकारी राजकीय कारकिर्द भारतीय स्त्रियांना सदैव प्रेरणा देणारी आहे. अहिल्याबाईंच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..