माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

रविवार, ३१ मे, २०२०

मुले

*मूल म्हणजे सर्जनशील जीव...!*
मी माझ्या सेवेत लागल्यापासून मुलांची जडघडण,वर्तवणूक शिकण्याची धडपड,त्यांच्या वर्णनात्मक नोंदी,याबाबत विविध पुस्तक वाचले,प्रत्यक्षात अनुभव घेतले,व्याख्याने ऐकली.तसेच शिक्षक व पालक या दोघेही भूमिकेत सहभागी झालो आहे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून मी *मूल* या घटकांवर स्वतःला भावलेले,मला आवडलेले विचार, स्वतःच्या शैलीत,आणखी सोप्या भाषेत,प्रभावी पद्धतीने,आपणास वाचनासाठी सादर करत आहे.
*मूलं म्हणजे देवघरची फुले* असे आपण सहज म्हणत असतो.आपणास मुले ही सर्वांना आवडणारी,हवीहवीशी वाटतात.  आणि म्हणूनच त्यांना आपण फुलांसारखे जपतो. नक्कीच पण या उपमा मागे आपण मूलं म्हणजे फक्त एक फुल नाही तर ते एक सर्जनशील जीव आहे हे कुठंतरी विसरतो आहे.
आपण प्रत्येक जण मुलांच्या बाबतीत एक प्रसिद्ध सुभाषित सहज म्हणतो असतो की,
*लहान मूल म्हणजे मातीचा गोळा...*
*आकार दयावा तशी मूर्ती घडते.*
वरील सुभाषित हे आताच्या एकविसाव्या शतकात कितपत योग्य की अयोग्य याबाबत जर चर्चा घडविली तर फारच विस्तृत अशी चर्चा घडेल,वाद,प्रतिवाद होतील असे मला वाटते.काही विचारवंत सांगतील हे कसे काय शक्य आहे,मूल काय निर्जीव वस्तू आहे का?मुलांना एक स्वतःचे विश्व आहे,मुलांचे स्वातंत्र्यावर आपण गदा आणत आहे का?का म्हणून आपण त्यांना गोळा म्हणून घडवायचं. अश्या या आजच्या आधुनिक युगातील आधुनिक पालकांना सहजासहजी मान्य होणार नाही.
महत्त्वाचे म्हणजे असं त्यांना जे वाटतंय त्यातही काही वावगे नाही,काहीतरी सत्य,तथ्य असेलच.आणि आता तर शिक्षणातील बालशिक्षणात देखील बालस्वातंत्र्य याला खूपच महत्त्वाचे भूमिका आहे,म्हणूनच मला तरी वाटते की लहान मूल म्हणजे 'मातीचा गोळा' हे  बोलणे,समजणे आता कुठे तरी थांबावे लागेल.
मूल जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो आपल्या सोबत एक महाशक्तीशाली मेंदू  घेऊनचं येत असतो.अवघ्या एका दिवसाच्या मुलाला गंध/वास समजतो, हे मी नाही म्हणत हे प्रयोगाने सिद्ध झालेले आहे.प्रत्येक मुलाकडे काही उपजत ज्ञान असतंच.
आपण आपल्या घरी देखील मुलांचा बारकाईने अभ्यास केला तर लहान मुलाला आपली आई कोण,ती हसणार तो हसतो,दूध नाही मिळाले तर रडतो, नाविन्यपूर्ण अशा विविध क्रिया करतचं असतो,म्हणून अशा विविध गोष्टींच्या आधारे मूल हे पहिल्या वर्षा-दोन वर्षात भराभरा शिकतच असतं, कुठल्या कृती,कोणत्या टप्प्यावर, कोणत्या क्रमाने करायच्या आहेत,याचं प्राथमिक ज्ञान प्रत्येक मुलाला असतंच.रांगण,उभं राहणं, पाय टाकण, खायला शिकणे, बोटाचा वापर करणे अशी कौशल्य ते आत्मसात करत जातं.त्याचं कुतूहल,त्याची जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देत नाही.एक दीड वर्षाचे मूल झालं की ते आई-बाबाचं बोट धरून घरा बाहेर पाऊल टाकत.भोवताली काय चालू आहे याची जिज्ञासा, कुतूहल त्याला निर्माण होतं.
मूल ही सर्जनशील जीव का हे सांगत असतांना आपण मुलाकडे पाहिले तर मूल हे फक्त निरीक्षण करीत नसतं, तर ते जे नजरेला दिसतं त्याचा 'अर्थ'ही लावू पाहत. त्यासाठी ते स्वतःची कल्पना शक्तीही वापरत असतं. तो इवलासा जीव कल्पनाशक्ती,तर्कशक्ती,मनानं भोवताली घडणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास करू लागतो. याबाबत मी माझ्या एका वर्षाची मुलगी समृद्धी चा प्रसंग उल्लेख करतो. माझ्या घरातील  दोन पायऱ्या चढतांना सर्व प्रथम तिने आमचे निरीक्षण केले,त्यानंतर ती पहिल्या पायरीवर चढली, तिथे पडून जाऊ नये म्हणून सावकाश तोल सांभाळला,त्यानंतर थोडी थांबली व पुन्हा चढू लागली व दुसऱ्या पायरीवर चढली, पण दुसऱ्या पायरी संपल्यावर उंबरठ्यावर चढतांना अवघड वाटले म्हणून रडू लागली व जवळ बोलवू लागली,मग मी पोहचल्यावर तिने हात वरती केले,पण मला सर्व प्रसंग समजला म्हणून मी तिला न उचलता हा उंबरठा कसा ओलांडावा हे तिला कृतीने दाखविले.व उंबरठ्यावर चढण्यास तिला हाताने धीर देऊन चढवलं.ही क्रिया मी फक्त एकच दिवशी काही मिनिटे पर्यंत केली.तिने ते सर्व पाहिले.त्या दिवशी साधारणतः दोन ते तीन वेळेस तिने ही क्रिया मी नसतांना केली.पण दुसऱ्या पायरीनंतर तिला घरातले कोणीही सदस्य न समजता उचलून पार करत असे.म्हणून तिला अपेक्षित कृती करता आली नाही.पण जेव्हा दुसऱ्या दिवशी मी घरात असतांना ती पायरीवर आली तर मला कालचा प्रसंग आठवला व ही काही शिकली का? हे मी अभ्यासायच ठरवलं.मग मी लांबूनच तिला न दिसू देता पाहत राहिलो.त्यानंतर मग मी जे पाहिले ते मी कधीही विसरू न शकणारे असा प्रसंग घडला.समृद्धीने पहिली पायरी व दुसरी पायरी ही सरसपणे न घाबरता चढली.उंबरठा ओलांडताना ती थोडी थांबली व उजवा पाय दुसऱ्या पायरीवर घट्ट ठेवला व डावा पाय उंबरठ्याजवळ घेऊन अलगद अडकवून सहज वरती आली.व पुन्हा मागे वळून इकडे तिकडे पाहून, पायरीकडे बघून हसू लागली.तिच्या त्या हसण्यात तिने काहीतरी नविन ज्ञान संपादन केले असा स्पष्ट भावार्थ मला दिसला.व त्यानंतर कधीही तिला गरज भासली नाही.
वरील प्रसंगावरून मूल हे अवतीभोवतीच्या नवनव्या गोष्टींशी स्वतःच नातं जोडत राहतो. हे मला स्पष्ट जाणवलं.म्हणूनच मला तरी वाटते की ही उपमा बदलत आहे.
मुलांना मातीचे गोळे,देवघरची फुले समजून घडवू नका,त्यांना त्यांच्या *आंतरिक उर्मी,सुप्त  शक्ती व उपजत गुणांनी* फुलू द्यावे,शिकू दयावे. काही मानसतज्ञ यापुढे जाऊन म्हणतात की,"पालकांनी,शिक्षकांनी मुलांना फुलासारख जपण्याऐवजी फुलझाडासारखं वाढवावं."
तात्पर्य एवढेच की मूल हे फक्त देवाघरची फुलं, मातीचा गोळा नाही तर ते अतिशय सर्जनशील, तरतरीत,सुप्त गुणांचा *भांडार तसेच नवनवीन आव्हानांचा शोध घेऊन ते पेलण्याची क्षमता असणारा,चुका झाल्या तरी खचून न जाता सदोदित प्रयत्न करणारा,संवाद साधण्याची कला अवगत करून समाजाभिमुख* होण्याची तयारी करणारा असा तो आधुनिक युगातील प्रतिभावंत,सर्जनशील जीव आहे.
म्हणून पालक, शिक्षक म्हणून आपली जबाबदारी,दृष्टीकोण हा फार व्यापक झाला आहे. आपले स्थान हे फक्त कुंभाराचं नाहीय तर एका चाणाक्ष चिकित्सक सारखी हवी आहे,जो उत्तम प्रेमाने,हाताने रोगनिदान करून औषधोपचार देऊन रोगमुक्त करून प्रफुल्लत्तेने मुक्त संचार करण्यास मदत करणारे हवे आहे.
◆◆◆◆◆◆◆धन्यवाद◆◆◆◆◆◆◆
     *✒️लेखक-*
  *श्री.विशाल दिलीप पाटील*
जि.प.शाळा अजेपूर ता.जि.नंदुरबार
मो.9922642954

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..