काल रात्री भारतमाता माझ्या स्वप्नात आली
१५ ऑगस्टला संपावर जाते असं म्हणाली
म्हणते जो तो करतोय संप आपल्या मागण्यांसाठी
आहेत मागण्या माझ्याही मी का रहावे पाठी
नागरिक म्हणून तुम्हाला नाही कुठलीच शिस्त
स्वातंत्र्य या देशामधले वाटू लागले स्वस्त
माझ्यासाठी का द्यावे बलिदान सैनिकांनी
तुम्हास त्याची चाड नाही का मरावे त्यांनी
संप मोर्चे बंद यांनी बिघडवले स्वास्थ माझे
जाती पाती मधली तेढ पोखरते शरीर माझे
पाण्याचा अन सीमेचा करता वाद तुम्ही
दोन्ही आहे या देशातच हे विसरता तुम्ही
केवळ आपला विचार करता माझा विचार नाही
ठेवा लक्षात स्वातंत्र्य हे फुकट मिळाले नाही
मागणी माझी एकच आहे जबाबदारीने वागा
देश माझा मी देशाचा या कर्तव्याला जागा
नाहीतर त्यादिवशी मी माझे अस्तित्व नाकारेन
सारे तुम्ही अप्पलपोटी हे सत्य मी स्विकारेन
नसेल कुठला देश तुम्हाला नसेल कुठली भूमी
अन्न आणि पाण्याविना मग तडपाल तुम्ही
बोलून इतके सारे भारतमाता गायब झाली
जागा झालो झोप माझी कायमची उडाली
संपले स्वप्न तरीही बाकी उरले इतके सत्य
व्यथेत भारतमातेच्या नक्कीच आहे तथ्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..