असं घडू शकतं .
" समजा , मला कोरोना पॉझिटिव्ह आला , तर तुझा रोल काय राहील ?"
एका खूप जवळच्या मित्राने सहज प्रश्न विचारला आणि मी हादरलोच ! बापरे , हे सहज शक्य आहे आताच्या वातावरणात . तुमच्या-माझ्या पैकी कुणालाही या प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते .
"अरे छे ! कसला विचार करतोस . हे कसे शक्य आहे ? त्या मित्राला जेमतेम कटवता आले ,पण त्याच्या प्रश्नाने शांत पहुडलेल्या मनाला आत बाहेरून घुसळून टाकले . तर .... तुझा रोल काय ? माझा रोल काय राहील .
मी उत्तराची शृंखला गुंफण्याचा प्रयत्न करू लागलो . हा मित्र कुणाकुणाच्या संपर्कात आला ? भाजीपाला, फळे , दूधवाला , चहावाला .. कोणाकोणाकडे जातो ? बाहेरगावी कुठे गेला होता ?
याची पत्नी , पोरगा, म्हातारे आई-वडील आणि हो .. बापरे ! याची पत्नी पुन्हा ... बाप होणार आहे हा ! आमचे संध्याकाळचे एकत्र फिरणे , चहाचा कट्टा , एकाच ग्लासात कधीकधी थ्री बाय फाईव्ह ,कधी टू बाय फोर आणि निवांत तासभर गप्पा .
मी सोशल मीडिया , इलेक्ट्रॉनिक , प्रिंट मीडिया , डॉक्टरांची मते , नवनवीन उपचारपद्धती , नव्या लसी , नवे संशोधन , विलगीकरण , रुग्णांशी व्यवहार , आहार-विहार , औषधोपचार सारे बारकाईने अभ्यासू लागलो . सर्व रुग्णांच्या बाबतीतच शोधत राहिलो . शृंखला पूर्ण होत आली .
खरंच .... असा प्रसंग आला तर ? उत्तर मात्र मिळाले नाही . माझा रोल काय ?
फक्त 108 ला कॉल लावणे , हतबल होऊन ॲम्बुलन्स ची वाट पाहणे , ती आल्यावर दोन मीटर लांबूनच किमान चौदा दिवस पुरतील एवढे कपडे आणि सामान घेतले ना एवढं विचारणं . बस्स..
मी हबकून आता त्याचा रोल काय ? याचा विचार करू लागलो . जमलं तर चौदा दिवसांनी या दुनियेत नाहीतर ..... कदाचित निरोप द्यायलाही यापैकी कोणीही येणार नाही . मला राहवेना .अखेर एक कॉल केला त्याला .
" तू तर प्रश्न टाकून मोकळा झाला मित्रा ! पण मला अंतर्बाह्य अलर्ट करून दिलं . चल , आता ठरवूया . समोरच्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना असू शकतो , याचा विचार करूनच त्याच्याशी वर्तन करू. सोशल डिस्टन्सिंग , मास्कचा वापर , गर्दीत न जाणे , हँडवॉश , सॅनिटायजर चा वापर .... या गोष्टी स्वतः आत्मसात करू या .
कोरोना कितीही दिवस राहू देत ,
तुम्ही-आम्ही त्याला दूर ठेवू यात.
.... ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..