🏠
*I Love You पप्पा* !
(प्रत्येक पालकाने अवश्य वाचा)
आजचा दिवस जरा जास्तच खराब गेला. दिवसभर बरीच दगदग झालेली होती त्यामुळे घरी आल्यावर थोडा आराम करावा म्हणून जरा बेडवरती आडवा झालो व लगेच डोळा लागला. थोड्या वेळेतच बायकोच्या ओरडण्याने जाग आली, काय झालं म्हणून विचारले तर कळाले की मुलांनी (एक सात वर्षाचा व एक चार वर्षाचा) मोबाईल पाडला व त्याची स्क्रीन तुटली. स्क्रीन तुटली म्हटल्यावर माझा पारा खूप वर गेला, राग अनावर झाला व मी दोन्हीही मुलांना फटके द्यायला सुरुवात केली, त्यांच्यावर जोर जोराने ओरडू लागलो, बायको मला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली तर मी तिच्यावरही तुटून पडलो. पुढचे काही मिनीटे असेच गेले, मुलांना मारून झाल्यावर, मी स्टडीरूममध्ये जावून बसलो. मुले भेदरलेल्या अवस्थेत हॉलमध्येच बसून राहिली.
थोडावेळ तसाच बसून राहिलो, मुलांचा प्रचंड राग आला होता, मोबाईलचं नुकसान झालं होतं, झालेलं नुकसान अक्सेप्ट करायला मन तयार नव्हते, पण जे झालं होतं ते तर काही बदलणार नव्हतं. मनाला कसं शांत करू कळत नव्हते. आता मोबाईल रिपेअर करण्यासाठी पैसे लागणार होते त्याचेही टेंशन आले होते. कॉम्पुटर चालू करून डेटा एन्ट्रीचे काम करू लागलो.
थोड्या वेळानंतर बायको जेवणासाठी बोलवायला आली पण माझा राग अजून शांत झालेला नव्हता त्यामुळे तिच्यावर परत खेकसलो,
“मला जेवायचे नाही.”
“थोडं जेवून घ्या, जेवणावर का राग काढता?”
“तुला तर मुलांना सांभाळता येत नाही, त्यांना चांगलं काही शिकविता येत नाही, सारखी दंगामस्ती करत असतात, सारखी तोडफोड चालू असते, तुम्ही नुकसानी करत राहायचे आणि मी राब राब राबायचे, तुम्हाला तर घरबसल्या सर्व काही आयते मिळते ना? तुम्हाला काय त्याचे? मी आपला राब राब राबतो आहे, तुम्ही ओता त्यावर पाणी” माझा राग परत उफाळून आला.
“एवढं रागवू नका हो, चुकून पडला मोबाईल त्यांच्याकडून.”
“अगं पण तू त्यांना मोबाईलला हातच का लावू दिलास, तुला दिसत नव्हते का? वेंधळ्यासारखी करत असतेस, मुलांकडे लक्ष नाही, जर मुलांनी परत मोबाईलला हात लावला तर बघ!” माझा पारा आणखीनच चढला होता, स्क्रीन तुटल्याचे दुख होत होते, जेवणाची इच्छाच होत नव्हती.
मी जेवणाला नाही म्हटल्यामुळे मुलांना वाईट वाटलं, दोघंही माझ्याजवळ येवून म्हणाली,
“सॉरी पप्पा, आम्ही परत नाही असे करणार.”
“परत नाही करणार? तुम्हाला करू देतो का तेच बघा, आजपासून तुमचं सर्वच बंद, खेळायला जाणं बंद, टीव्ही बघणं बंद, मोबाईलला हात लावायचा नाही, फक्त अभ्यास करायचा, कळलं का?” मी मुलांवरती खेकसलो.
मनात विचार चालू होता निदान आठ दहा हजार रुपये तरी लागतील, कसे एवढे पैसे जमवायचे? ह्या मुलांना तर अजिबातच अक्कल नाही, पैसे कमवायला किती कष्ट करावे लागतात कधी कळेल ह्या मुलांना? मी आपले राब राब राबायचे व ह्या सर्वांनी माझ्या जीवावर मजा मारायची. मनात विचारांचे चक्र चालू होते व मी मनातल्या मनातच मुलांवर राग काढत होतो. डोकं सुन्न झाले होते म्हणून मी कीबोर्ड बाजूला करून टेबलावर डोकं टेकवून बसलो व थोड्या वेळेतच माझा डोळा लागला.
“स............टा.....क...” कुणीतरी खूप जोराने माझ्या थोबाडीत मारली होती. मी खडबडून उठून बसलो व समोर बघतो तर काय साक्षात परमेश्वर माझ्या समोर उभा होता व त्यानेच माझ्या श्रीमुखात लगावली होती.
“हे परमेश्वरा तू मला का मारलेस?” मी गाल चोळत विचारले.
“तू मुलांना का मारलेस?”
“त्यांनी मोबाईल पाडला, त्याची स्क्रीन तोडली म्हणून मी त्यांना मारले” मी बडबडलो.
“तो मोबाईल तुझ्या हातून पडला असता तर?”
परमेश्वराने विचारलेल्या प्रश्नाने मी चपापलो, माझ्याकडे त्याचे काहिही उत्तर नव्हते. पण चूक कशी कबूल करायची? मानवी स्वभाव आड आला व मी बोललो,
“देवा हे त्यांचे पहिलेच काम नाही, कायमच ते काहीतरी करत असतात. सारखा गोंधळ घालत असतात, खोड्या करत असतात, एक मिनिटभर देखील शांत बसत नाही, सारखा उपद्व्याप करत असतात.”
“तुला काय म्हणायचं आहे, ते फक्त उपद्व्यापीच आहेत का?”
“तसं नाही देवा, पण त्यांनी समजून घायला पाहिजे ना, मी राब राब राबतोय, कष्ट करतोय व त्याची त्यांना काहीच किमंत नाही”
“असं ते म्हणाले का?"
“नाही तसं काही ते म्हणाले नाही पण त्यांच्या वागण्यावरून दिसतच ना!” मी कसंबसं बोललो.
“काय दिसतं त्यांच्या वागण्यावरून?” देवाने मला परत प्रश्न केला.
“हेच कि, मी त्यांच्यासाठी राब राब राबतोय, त्यांना चांगल्या शाळेत घातले आहे वर्षाची लाख रुपये फी भरतोय, त्यांना चांगल्या क्लास्सेस मध्ये घातलेय ज्याची पंचवीस हजार रुपये फी भरतोय, पण ती अभ्यासच करत नाहीत” मी माझं रडगाणे चालू केले.
“तुला हे सर्व करायला त्यांनी सांगितले का?”
“नाही त्यांनी नाही सांगितले पण त्यांचे चांगले भविष्य घडावे, ते यशस्वी व्हावेत, त्यांनी खूप नाव व पैसा कमवावा, आमचं नाव रोषण करावं म्हणून हे सर्व करतोय. ते इतके लहान आहेत त्यांना काय कळतं, हा सर्व विचार मीच केला पाहिजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, माझं कर्तव्यच आहे ते.”
“तुझं हे कर्तव्य पार पाडत असतांना तू कधी त्यांचा विचार केला का?
“म्हणजे? मला समजले नाही, मी त्यांचाच तर विचार करतो, त्यांच्या भल्यासाठीच करतोय की मी हे सर्व!” मला देवाचा प्रश्नच समजला नाही.
“तुझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस कोणते? तू सर्वात आनंदी केंव्हा होतास?” देवाने परत एक प्रश्न विचारला.
“बालपणीचे दिवस” खूप विचार करून मी उत्तर दिले.
“मग त्यांचे बालपण का हिरावून घेतोयेस? सकाळी शाळा! दुपारी ट्युशन! सायंकाळी हॉबी क्लास्सेस! त्यांनी खेळ पण कोणते खेळायचे तर जे तुला आवडतात तेच, कारण त्याच खेळात करिअर आहे म्हणून? त्यांनी हे नाही करायचे, त्यांनी ते नाही करायचे, त्यांनी असे नाही बोलायचे, त्यांनी तसे नाही बोलायचे! अरे तू तर त्यांना स्वच्छंदीपणे जगू पण देत नाहीयेस, तरीही ते तुझी काहीच तक्रार करत नाही आणि तू त्यांच्या तक्रारींचा पाढाच वाचतोय.”
देवाने माझ्या काळजावरच घाव केला होता, काय बोलावे काहीच कळत नव्हते.
“मला एक सांग मी तुला दिलेली आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट काय?” देवाने विचारले.
"अर्थातच हे जीवन, माझा परिवार व माझी मुलं.”
“जर तुला हे कळतंय की तुझी मुलं मी तुला दिलेली आहेत, मग तरी देखील तू त्यांच्याबरोबर असं वागतोस, ती मुलं तुझ्या पदरात टाकून मी चूक तर ना केली?”
परमेश्वराच्या ह्या वाक्याने माझ्या दोन्हीही डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, मला माझी चूक समजली होती तरीही मी परत देवाला प्रश्न केला.
“परंतु देवा ती असं का वागतात? काहीच ऐकत नाही, काहीच करत नाही, फक्त दंगामस्ती करतात, फक्त त्रासच देतात, कधी कधी तर जगणं मुश्कील करून टाकतात.”
“जर खरचं तुला त्यांचा इतका त्रास होत असेल तर मी घेवून जातो त्यांना, मग राहा त्यांच्याशिवाय एकटाच सुखाने, मग तुला त्यांच्यासाठी काहीही करावे लागणार नाही, तुला हवं तसं जग, तुला ते काहीही त्रास देणार नाही.”
देवाच्या ह्या वाक्याने क्षणात माझे डोके ठिकाणावर आले व मी देवाच्या पायावर लोटांगण घातले,
“नाही असे करू नकोस, माझी मुले माझं सर्वस्व आहेत, त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही, हवं तर तू माझा प्राण घे परंतु त्यांना माझ्यापासून हिरावू नकोस” बोलतांना माझा श्वास अडकत होता, जोराची धाप लागली होती, दोन्हीही डोळ्यांत अश्रू मावत नव्हते, नुसत्या मुलांना नेण्याच्या विचारानेच मी अर्धमेला झालो होतो.
“उठ! मी असं काहीही करणार नाही मी फक्त तुला त्याची जाणीव करून देत होतो.”
“हे परमेश्वरा! मग मी त्यांच्या भविष्याचा विचारच करायचा नाही का? त्यांच्यासाठी बघितलेली माझी स्वप्ने चुकीची आहेत का? त्यांना मी परिपूर्ण नाही बनविलं तर म्हातारपणात ते आम्हाला आधार कसा देतील? माझं हे सर्व करणं व्यर्थ आहे का?” मी माझी शंका विचारली.
“मी कधी म्हटलं हे सर्व करणं व्यर्थ आहे, तू जे करतोय ते तू करायलाच पाहिजे पण फक्त योग्य विचार करूनच, प्रत्येक वेळी त्यांचा विचार कर, त्यांना हवं तसं जगू दे, त्यांना हायब्रीड बनवू नकोस, त्यांना त्यांच्या पद्धतीने घडू दे आणि महत्वाचे म्हणजे म्हातारपणात ते तुझा आधार तेंव्हाच बनतील जर आज तू त्यांचा आधार झालास तर, आज तू त्यांच्याशी हिटलर सारखा वागला तर तेही तुझ्याशी म्हातारपणात तसेच वागतील, जे पेरशील तेच उगवेल.”
“हे परमेश्वरा! मला तुझं म्हणणे पटलंय पण, त्यांना त्यांच्या पद्धतीने घडू दिले तर ते काहीच करणार नाहीत, आजच्या जमान्यात नाव, पैसा खूप महत्वाचा आहे तो नाही कमविला तर त्यांचे भविष्य बिघडेल, मग ते मलाच टोमणे देतील, मग मी गप्प बसून तसं होतांना बघायचं का?”
“एकदा डोळे उघडे करून त्यांच्याकडे बघ, त्यांच्यात अफाट क्षमता दडलेल्या आहेत, त्या क्षमतांचा त्यांना वापर करायला शिकव, त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा दाखव, मग तुला पाहिजे ते सर्व काही मिळेल आणि नाव, पैसा ह्यापेक्षा ते जीवनात आनंदी कसे राहतील यावर भर दे.”
एवढे बोलून परमेश्वर गायब झाले. परमेश्वर गायब होताच मला खडबडून जाग आली व मी बेडरूमकडे धाव घेतली दोन्ही मुले झोपलेली होती, त्यांना तसेच कडेवर उचलून घेतले व पटापट त्यांचे मुके घेवू लागलो, दोन्हीही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, ती दोघे झोपेच्या धुंदीतच माझे अश्रू पुसत होती, अश्रू पुसता पुसताच मला घट्ट बिलगले व म्हणाले,
“सॉरी पप्पा, आमच्यामुळे तुमचा मोबाईल तुटला, आम्ही परत कधीच असे करणार नाही. I love you पप्पा.”
मुलांच्या ह्या वाक्याने तर मी हादरूनच गेलो व मुलांना मिठीत घेवून मुसमुसून रडू लागलो. मी जेवढं प्रेम मुलांवर करतो त्याच्यापेक्षाही कैक पटींनी ते माझ्यावर करतात हे मला उमगलं होतं, माझ्यासाठी ते त्यांचा आनंद सोडायला तयार होते पण मी किती बुरसटलेल्या विचारांचा, पैस्यापुढे मला त्यांची, त्यांच्या आनंदाची किमंतच नव्हती. मला आज स्वतःचीच लाज वाटत होती.
ता.क. - हा खुप गहन प्रश्न आहे पण खरचं आपण आपल्या मुलांना त्यांच्या क्षमता, त्यांच्या क़्वालिटी, त्यांचे टॅलेंट, पोटेन्शियल, त्यांच्या मर्यादा ओळखून त्यांना हवं तसं करिअर करू देतो? खरचं आपण मुलांच्या क्षमता, क़्वालिटी, टॅलेंट, मर्यादा ओळखू शकतो? आजचे जीवनमान हे एकदम बेभरवशाचे व ताणतणावचे झालेले आहे, आपल्या मुलांना ह्यातून वाचवायचे असेल तर त्यांच्या क्षमता ओळखून, त्यांच्या मर्यादा ओळखूनच करिअर करणे हि काळाची गरज झाली आहे. मुलांचे शिक्षण, करिअर निवडतांना पैसा व नाव याबरोबरच आपला फोकस त्यांच्या आनंदी व सक्षम जीवनावर असला पाहिजे. ती जीवनात सदैव आनंदी असली पाहिजे. जर तुम्हांला मुलांच्या क्षमता ओळखता येत नसतील तर त्यासाठी एक्स्पर्टची मदत घ्या.
लेख आवडल्यास अभिप्राय जरूर द्या, हा लेख जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहचवा. पुढची पिढी आनंदी व सक्षम बनविण्यासाठी आपल्या सर्वांचेच योगदान आवश्यक आहे. धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..