"चिडका कट्टा..."
तो फक्त पंचावन्न किलोचा देह होता.
मनानं कधीच मेलेला.
आख्खं घर टोचून टोचून बोलायचं.
सतत अॅक्युपंचर...
त्याला काहीच वाटायचं नाही.
चांगला शिकलेला.
डबलग्रज्युएट.
पण घुम्या.
तोंडातून एक शब्द बाहेर पडायचा नाही.
पहिल्या पहिल्यांदा इंटरव्ह्यूला काॅल तरी यायचे.
याचं म्यूट चॅनल कोण पसंत करणार ?
दरवेळी..
" आम्ही कळवतो तुम्हाला नंतर..."
एवढं मात्र त्याला लगेच कळायचं..
रेकाॅर्डच होता त्याचा तसा...
एकाही ईन्टरव्ह्युत तो कधी पास झाला नाही..
दीड वर्ष झालेलं.
तो बेक्कार...
खरंच बेक्कार माणूस होता तो.
घरातला प्रत्येक जण...
आपला राग त्याच्यावर काढायचा..
'खायला काळ, भुईला भार...
तू तों साला धरती पें बोज है !'
खूप चिडायचा तो.
अगदी मनापासून.
पण ..
मनातल्या मनातच.
चेहरा निर्विकार.
अगदी सुनिल शेट्टीसारखा.
हे बघून समोरचा आणखीन पेटायचा.
नुसता धूर...
फुरसत से बनायी हुवी चीज था वो.
हल्ली हल्ली तर राग येतच नाही त्याला.
त्यानं ठरवून टाकलंय.
आपला जन्म यासाठीच झालाय..
फक्त बोलणी खाण्यासाठी.
कानाचा त्याच्या शरीराला काहीही ऊपयोग नाही.
जगानं मारलेले टोमणे, त्याच्या मेंदूपर्यंत पोचतच नाहीत.
गेंड्याची कातडी झालीय त्याची.
निगरगट्ट.
एक दिवस त्याचा बाप..
खूप बोलला त्याला.
दात विचकटून.
त्याला कुठलं ऐकू येतंय ?
शेवटी त्याचा बाप धाय मोकलून रडला..
कान नसले तरी हार्ट होतं त्याच्याकडे.
बापाला रडताना बघून तो गलबलला.
काहीतरी करायलाच हवं.
कुठंतरी हातपाय मारायलाच हवेत.
कुठं ?
त्याची लायकी काय ?
तो घराबाहेर पडला.
गावाबाहेरची टेकडी.
शून्य मिनटात चढून गेला.
छे छे!
जीव वगैरे नाही देणार तो..
टेकडीच्या हाय्येस्ट पाॅईंटवर..
बसला.
एका दगडावर , दुसरा दगड.
समोरच्या आभाळात, त्यानं त्याचं मन काढून ठेवलं.
स्वतःलाच शोधू लागला.
तीन चार तास...
जोरदार स्टडी.
स्वतःचाच.
काय पाहिलंस माझ्यात ?
काही सापडलं ?
नाही ना ?
ठरलं...
निश्चयी चेहरा घेवून तो टेकडी ऊतरला.
एका मित्राला गाठला.
बाजारपेठेतला त्याचा रिकामा गाळा भाड्यानं घेतला..
एक महिन्यासाठी.
मित्राला बजावलेलं..
धंदा चालला तर भाडं देईन..
नाहीतर दिवाळं.
दुसर्या दिवशी दुकानावर पाटी लागली.
"चिडका कट्टा..."
या आणि मोकळे व्हा..
पहिले दोन दिवस तो माशा मारत बसला.
पेशन्स.
त्याच्याकडे खूप होता.
तिसर्या दिवशी एक तिरसट म्हातारा आत शिरला.
त्याच्या दुकानाच्या नावावरनं घालून पाडून बोलला.
अगदी शिरा ताणून ताणून.
'रिकामटेकडी .
तरूण पिढी...'
वगैरे वगैरे. .
दहा मिनिटांनी थकला.
विझला..
यानं शांतपणे सगळं ऐकून घेतलेलं.
म्हातार्यानं शेवटी एकच प्रश्न विचारला.
" कशासाठी ?"
तो हसून म्हणाला..
" याचसाठी..
चीडचीड , राग , गुस्सा काहीसी म्हणा..
निचरा नाही झाला तर माणसाला संपवतो.
इथं या आणि मोकळं व्हा..
आता कसं वाटतंय ?"
म्हातारा पहिल्यांदा स्माईलला.
" शांत .
बरं वाटतंय "
तो पुन्हा मुद्द्याचं बोलला.
" शंभर रूपये.
तुमच्यापासूनच बोहनी झाली."
म्हातार्यानं खुशी खुशी शंभर रूपये दिले.
आनंदानं तो बागडू निघून गेला.
त्याची पहिली कमाई..
घर खुश.
आज कुणीही त्याला टोचून बोललं नाही.
नंतर त्यानं मागं वळून बघितलंच नाही.
'चिडका कट्टा' फेमस.
सुसाट..
त्याची गाडी सुसाट पळू लागली.
बाॅसवरचा राग.
सासूवरची चीडचीड..
धंद्यात अपयश .
प्रेमात असफलता..
रिझल्ट एकच.
चीडचीड आणि वैताग.
रोज ट्रक भरून, त्याच्या दुकानात गिर्हाईक यायचं.
चीड चीड चीडायचं.
राग ओकायचा.
शांत चित्तानं घरी जायचं.
तो सगळं ऐकून घ्यायचा.
घेणारच.
त्याचेच तर पैसे घेत होता तो.
धंदा वाढत चालला.
लोड सहन होईना.
स्टाफ भरला.
बहिरी माणसं...
त्याच्यासारखीच.
तीन मजली आॅफीस.
बंगला.
गाडी.
त्याचं लग्न झालं.
बायको खुष.
घर खुष.
कारण...?
तो कधीच चिडायचा नाही.
त्याच्या घरात नेहमी प्रसन्न वाटायचं.
कॅलेंडरी फडफड झाली.
वर्षामागून वर्ष गेली .
प्रसन्न..
त्याचा मुलगा.
लाडाकोडात वाढलेला.
कसाबसा ग्रॅज्युएट झाला.
पुढं ?
पुढं काहीच नाही...
गावभर गाड्या पळवत ऊंडारायचा.
ऊद्योग ना धंदा.
रिकामटेकडा...
बापाचं काळीज त्याचं.
एक दिवस लेकाला बोलावलं त्यानं.
चांगला सोलला.
चिडला.
आयुष्यात पहिल्यांदाच.
वाट्टेल ते शब्द ओकले.
त्याच्या पोरानं खाली घातलेली मान वर केली नाही.
ढिम्म.
शेवटी तो रडकुंडीला.
त्याचा बाप शांतपणे शेजारी येवून ऊभा राहिला.
त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.
" तू रिटायर्ड हो आता.
नाही झेपत तुला धंद्याचा व्याप आताशा..
प्रसन्ना सांभाळेल सगळं.."
पुढे काय ?
'चिडका कट्टा' व्यवस्थित चालूय.
धाकटे मालक बसतात दुकानी..
तुम्हाला गरज वाटली तर सांगा. .
पत्ता देतो..
'चिडका कट्टा..'
जुग जुग जीयो.
...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..