माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

सोमवार, १ जून, २०२०

मोबाईल- एक भयंकर सत्य*





*वेऴ काढुन वाचा *
*मोबाईल- एक भयंकर सत्य*

दोन दिवसांपूर्वी आमच्या आईच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे MRI करण्यासाठी एका सेंटरवर घेऊन गेलो होतो. पाय कंबरेपासून खूप दुखत असल्याने लवकरात लवकर MRI करण्यासाठी मी विनंती केली आणि लगेच सर्व कार्यालयीन बाबी पूर्ण करून MRI करायला घेणार एवढ्यात एक अँबुलन्स त्या सेंटरवर आली.

अँबुलन्सचा आवाज, डॉक्टरांची धावपळ आणि नातेवाईकांच्या गाड्यांची लगबग बघून अंगावर शहारे आले. कदाचित अक्सिडेंट झालं असावं. नक्की काय झालं होतं ह्याची कल्पना नव्हती. तेवढ्यात पाच ते सहा वर्षाच्या एका मुलाला अँबुलन्समधून बाहेर काढलं. त्याच्या पूर्ण चेहऱ्याला ब्राउनपट्टीने कव्हर केले होते. तोंडातून एक नळी बाहेर काढून त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देत होते. त्या मुलाच्या शरीराची हालचाल अजिबात दिसत नव्हती. बहुतेक तो कुठून तरी पडला असावा आणि चेहऱ्याला खूप मार बसला असावा असं मला वाटलं.  मला पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून डॉक्टरांनी विनंती केली की, आमचा पेशंट एकदम सिरिअस आहे, मेंदूचा MRI करायचा आहे तरी कृपया तुमच्या पेशंटच्या आधी आम्हाला नंबर द्यावा. एकंदर ती सगळी धावपळ आणि रडारड बघून मी लगेच होकार दिला. माझ्यासमोरूनच त्या मुलाला स्ट्रेचरवरून MRI मशीन रूममध्ये नेण्यात आले. त्या मुलाचे वडील माझ्याच वयाचे असल्याने त्यांच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा काहूर मला कळत होता. डोळे पाण्याने भरले होते. त्या मुलाला आतमध्ये नेलं, त्याच्यासोबत डॉक्टर आत गेले आणि त्याचे सगळे नातेवाईक बाहेर बसले. रूमच्या बाहेर मी आमच्या आईच्या बाजूला बसलो होतो, तेव्हा त्याचे वडील माझ्या बाजूला, भिंतीला डोकं टेकून, छताकडे बघत शांत बसले होते. शेवटी मी न राहवून त्या मुलाबद्दल त्यांना विचारले. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन एका क्षणासाठी सरकल्यासारखं मला वाटलं.

सार्थक आमचा एकुलता एक मुलगा. लग्नानंतर पाच वर्षांनी झाला. घरामध्ये त्याचे सगळेजण खूप लाड करतात. काही दिवसांपासून त्याचा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता. त्याला पाहिजे ती वस्तू आम्ही लगेच उपलब्ध करून द्यायचो. मोबाईलवर गेम खेळणे, YOU TUBE वर व्हिडीओ क्लिप बघणे हा त्याचा आवडता छंद. मोबाईल हातात दिल्याशिवाय तो जेवतच नाही. काल संध्याकाळी तो शाळेतून आला तेव्हा त्याला खूप मोठी उलटी झाली आणि नंतर त्याला चक्कर आली. आम्ही लगेच त्याला जवळच्या डॉक्टरकडे नेलं. परंतु तो शुद्धीवर येत नसल्याने त्याला आम्हाला इकडे (हॉस्पिटलच नाव मी इथे लिहीत नाही) आणायला सांगितले.  कालपासून ह्याच्यावर उपचार चालू केले आहेत. अजून शुद्धीवर आला नाही. मेंदूचा MRI केल्यावर आजाराच्या अजून जवळ जाता येईल म्हणून आम्ही डॉक्टरांसोबत इथे आलो आहोत. डॉक्टर आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे *"मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूवर परिणाम होऊन तो कोमात गेला आहे."*  हे सगळं ऐकून मला माझ्या डोळ्यासमोर मोबाईलवर खेळणाऱ्या अनेक मुलांचे चेहरे डोळ्यासमोर आले.

तिकडून बाहेर पडल्यावर ही सगळी घटना मी माझ्या पत्नीला फोनवर सांगितली आणि आपल्या मुलाबद्दल कशी काळजी घ्यावी हे ठरलं. तीनेसुद्धा आमच्या मुलाला त्या दिवसात अजिबात मोबाईल दिला नाही. हे सगळं बघून शेवटी रात्री माझा मुलगा म्हणाला की, "जर तू मला मोबाईल देत नसशील तर तू माझ्यासोबत खेळ." हे वाक्य साधं आहे पण आईवडिलांना खूप काही शिकवण्यासारखं आहे. आपण आपल्या मुलांना योग्य तो वेळ देत नसल्याने ती मुलं दुसरा आसरा शोधतात आणि तो म्हणजे एकमेव मोबाईल.  हे असं का होतं ह्याच उत्तर मला त्याच रात्री माझ्या 3 वर्षाच्या मुलाकडून मिळालं.

ह्या अश्या जीवघेण्या आजारातून आपल्या मुलांना कसं वाचवायचं हे आता सर्व पालकांच्या हातात आहे, कारण तुम्ही मोबाईल वापरणारे सुज्ञ पालक आहात.

१. आपल्या मुलांना वेळ द्या, त्यांच्या सोबत खेळा.

२. मुलांसमोर पालकांनी मोबाईल जास्त वापरू नये.

३. मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणे हे काटेकोरपणे टाळावे.

४. आपल्या लहानपणीचे खेळ त्यांच्यासोबत खेळावे. आपलासुद्धा विरंगुळा होतो. मुलांचा वेळ सत्कारणी लागतो आणि जुने खेळ जतन करता येतात.

५. मुलांना कधीतरी मातीत, उन्हात खेळुद्या. पावसात भिजू द्या. आपण सुद्धा मातीत खेळुन, पावसात भिजूनच मोठे झालोय हे कधी विसरू नये.

६. त्यांना मातीचे किल्ले बनवायला शिकवा.

७. त्यांना पोहायला शिकवा. कॅरम, बुद्दीबळ, सापशिडी, ल्युडो ह्यासारखे खेळ खेळा.

८. आजूबाजूच्या ४-५ मुलांना एकत्र करून आपल्या काळातले जुने खेळ शिकवावे. त्यांना सुदधा आवड निर्माण होते. आपण पण हेच करत करत मोठे झालो हे कधी विसरू नये.

 कदाचित हे सर्व करताना आपल्याला कंटाळा येईल पण आपल्या मुलाला कोमात जाण्यापासून वाचवायचे असेल आणि हसतमुख कुटुंब बघायचं असेल तर हे करायलाच पाहिजे. ह्यामधून पालक आणि मुलं ह्यांच नातं अजून घट्ट होते.

शेवटी कमावलेला पैसा तसाच राहतो, आणि आपल्या मुलांना योग्य संस्कार करण्यात आपण कमी पडलो, त्यांना वेळ दिला नाही ह्याचंच आयुष्यभर दुःख मनात घेऊन जगावं लागत. 

  -----------------समाप्त---------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..