माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

सोमवार, १ जून, २०२०

सर मला लिहिता येतयं!!

सर,मला लिहिता येतयंं...!

 आमची शाळा सुरु होवून एक महिना झाला होता. सकाळी दहाची वेळ असेल,मी शाळेत गेल्यावर आज ''Good morning sir.'' याऐवजी ''सर,राणीचं बोट दरवाजात चेंबलयं .'' असे माझे स्वागत झाले. राणी म्हणजे इयत्ता पहिलीतील आमची विद्यार्थीनी आराध्या कोळी , राणी हे तिचं टोपणनाव.(राणी,माऊली,गऱ्या,चिनपाल ही आमच्या कोळीवस्तीवरील मुलींची टोपणनावे आहेत.)
   सकाळी राणी दरवाजात असताना दुसऱ्या मुलीने दरवाजा बंद केला अन् राणीचे एक बोट दरवाजाच्या फटीत सापडले . जखम झाली नसली तरी ते चांगलेच लाल झाले होते.मी तिला जवळ बोलावले,'' आराध्या,इकडे ये.'
   आराध्या जवळ आल्यानंतर मी तिला म्हंटलं, ''चल,आपण गावात डॉक्टरांच्याकडे जावू.'' ''नको सर...!'' ती म्हणाली.आता काय करायचं ? मला प्रश्न पडला.नंतर मी सर्व मुलांना माझ्याजवळ बोलावले . आराध्याला जवळ घेतले अन् तिच्या दुखावलेल्या बोटावर एक हळूवार फुंकर घातली आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगितले , ''आता,तुम्ही सर्वांनी प्रत्येकाने आराध्याच्या बोटावर एकेक फुंकर घालावयाची.'' लगेच सर्व मुलामुलांनी आनंदाने तिच्या बोटावर फुंकर घातली. आता  आराध्याचा चेहरा खुलला,ती हळूहळू हसू लागली.
   परिपाठानंतर आम्ही वर्गात आलो, हजेरी घेतल्यानंतर मी लगेच सांगितले,''राणी ,आज तू पाटीवर किंवा वहीत काहीही लिहायचे नाही,फक्त वाचन करायचं.'' जड अंत:करणाने आराध्या दिवसभर फक्त वाचत राहिली,कधी फळ्यावरील शब्द वाचायची तर कधी स्वत:च्या वहीतील... काहीवेळ फक्त पुस्तकातील चित्रे पाहत बसली.
   दुपारनंतर साडेचार वाजता पहिलीतील मुले घरचा अभ्यास घेण्यासाठी जवळ आली. मी सर्वांचा कालचा स्वाध्याय तपासून नवीन स्वाध्याय देत होतो. मी आराध्याचा कालचा स्वाध्याय तपासला आणि तिला सांगितले ,''तुझ्या बोटाला आज लागले आहे,तुला लिहिता येणार नाही म्हणून मी तुला आज स्वाध्याय देणार नाही.''
 आराध्या निराश होवून मान खाली घालून जागेवर जाऊन बसली. मी दोन - तीन विद्यार्थ्यांना स्वाध्याय दिला असेल,तितक्यात आराध्या आनंदाने उड्या मारीत माझ्याजवळ आली आणि म्हणाली,''सर,मला लिहिता येतयं..तुम्ही मला अभ्यास द्या.'' तिने मला तिची वही दाखवली,त्यामध्ये तिने फळ्यावरील शब्द लिहिले होते.मी तिला पुन्हा माझ्यासमोर शब्द लिहायला सांगितले ,तिने ते पटकन लिहून दाखविले. आता माझा नाईलाज झाला ,मी तिला वहीत स्वाध्यायाचा नमुना दिला.ती नाचत जावून आपल्या बेंचवर बसली. थोड्या वेळाने शाळा सुटली आणि आराध्या आनंदाने मुलांच्यासोबत आपल्या घरी निघून गेली.
   पण बोटाला लागलेलं असतानाही आपण इतरांच्या मागे राहू नये यासाठी जिद्दीने प्रयत्न करणारी आराध्या आज मलाच खूप काही शिकवून गेली .ज्ञानाच्या भुकेने झपाटलेली अशी पाखरं भेटली की शिक्षक झाल्याचं खूप समाधान वाटते.

✒श्री.दीपक माळी ९६६५५१६५७२.
खरशिंग,ता.कवठेमहांकाळ,जि.सांगली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..