माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

सोमवार, १ जून, २०२०

शाळा

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खुप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहीलीय!!

"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेत!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!

"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचेत!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन अर्थांचे अनर्थ झालेत!!

"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्नं पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्रं,
आजही रिकाम्याच राहील्यात!!

पेपरातल्या "जोड्या जुळवा",
क्षणार्धात जुळायच्यात!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्यात,तर कधी,
जुळता जुळता फसल्यात!

"एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्नं,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी...उत्तराची वाट बघत..

"संदर्भासहीत स्पष्टीकरण" लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता,
बरेचसे संदर्भ मागे पडलेत!!

"कवितेच्या ओळी पुर्ण" करणं,
अगदी आवडता प्रश्नं!
आजही शोध सुरु आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पुर्णत्वं आयुष्याला!!

"निबंध लिहा", किंवा "गोष्टं लिहा",
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्रं नियतीच ठरवणार!!

तेंव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्नं "option" ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्रं नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्नं ऐच्छिक नसतो!!

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खुप वर्षांनी आठवली...
तेंव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..